शायर, गीतकार नक्श लायलपुरी यांचे निधन
By admin | Published: January 23, 2017 04:42 AM2017-01-23T04:42:45+5:302017-01-23T04:42:45+5:30
नक्श लायलपुरी या नावाने सुपरिचित असणारे उर्दू शायर आणि गीतकार जसवंत राय शर्मा (८९) यांचे रविवारी सकाळी निधन
मुंबई : नक्श लायलपुरी या नावाने सुपरिचित असणारे उर्दू शायर आणि गीतकार जसवंत राय शर्मा (८९) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. लायलपुरी यांचा जन्म पंजाब येथे झाला होता. १९४०मध्ये हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. गीतकार म्हणून त्यांना पहिली संधी १९५२ साली मिळाली. परंतु १९७०पर्यंत त्यांना हवी तशी ओळख मिळाली नाही. मुंबईत तग धरण्यासाठी त्यांनी काही काळ पोस्टात नोकरीही केली. त्यांनी अनेक चित्रपटांचे शीर्षक गीत लिहिले; शिवाय संगीत निर्देशकाची भूमिकाही त्यांनी बजावली. त्यांची ‘मै तो हर मोड पर’, ‘ना जाने क्या हुआ’, ‘जो तुने छू लिया’, ‘उल्फत के जमाने की हर रस्म को ठुकारा’ आणि ‘दो दिवाने शहर में’ ही गाणी खूप गाजली. तर त्यांची ‘कोई इनकार है, नग्मा है, सदा है क्या है’ ही गझल जगप्रसिद्ध आहे. १९९०नंतर त्यांनी हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवून टीव्ही मालिकांच्या गाण्यांसाठी काम केले. त्यांनी ‘ताजमहाल’आणि ‘यात्रा’ या चित्रपटांसाठी गाणी लिहिली. पंजाबीतही त्यांनी ३५०हून अधिक गाणी लिहिली आहेत. (प्रतिनिधी)