ठाणे : शहरातील खारकर आळी परिसरातील एका औषधाच्या दुकानात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास कोल्हा शिरल्याने एकच खळबळ उडाली. दुकानमालकाला सुरुवातीला तो कुत्रा वाटल्याने त्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोल्हा असल्याचे समजताच तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अडीच तासांनंतर कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, कोल्ह्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून, त्यानंतर तो किती वर्षांचा आहे, हे समजेल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
खारकर आळीतील श्री मेडिकलमध्ये सकाळी ११.३० च्या दरम्यान हा कोल्हा शिरला. दुकानमालक राहुल पांडे म्हणाले, समोरच्या गल्लीतून अचानक हा कोल्हा आमच्या मेडिकलमध्ये घुसला. तो सरळ आतमध्ये जाऊन बसला. सुरुवातीला तो कुत्रा वाटल्याने त्याला झाडूने आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने झाडूही पकडून ठेवला. त्यानंतर हा कोल्हा असल्याचे लक्षात येताच आम्ही मेडिकल बंद करून थेट ही सर्व माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर काही वेळेतच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला.
ठाणे खाडी परिसरातून आल्याचा संशय
वनविभागाचे अधिकारी संजय पवार म्हणाले, वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन व प्राणिमित्र संस्थेच्या मदतीने कोल्ह्याला पकडण्यात अडीच तासांनंतर यश आले. ठाणे खाडी परिसरातून हा कोल्हा आला असून या कोल्ह्याच्या मागे कुत्रे लागले असल्याने तो मेडिकलमध्ये घुसला असावा, अशी शक्यता आहे.
फोटो : १८ ठाणे कोल्हा