शिरोडकर मंडई गाळेधारकांचा ठिय्या

By admin | Published: January 31, 2017 02:47 AM2017-01-31T02:47:40+5:302017-01-31T02:47:40+5:30

परळमधील डॉ. शिरोडकर मंडईतील गाळेधारकांनी महापालिका प्रशासनाविरोधात मंडईच्या ठिकाणी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत,

The Shirodkar Mandi | शिरोडकर मंडई गाळेधारकांचा ठिय्या

शिरोडकर मंडई गाळेधारकांचा ठिय्या

Next

मुंबई : परळमधील डॉ. शिरोडकर मंडईतील गाळेधारकांनी महापालिका प्रशासनाविरोधात मंडईच्या ठिकाणी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत, गाळेधारकांना मंडईच्या खुल्या जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गाळेधारकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे प्रभाग २०३मधील या मंडईचा मुद्दा पालिका निवडणुकीमध्ये प्रचारात महत्त्वाचा ठरणार आहे.
डॉ. शिरोडकर मंडई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लहू पडेलकर यांनी सांगितले की, गेल्या २० महिन्यांपासून मंडईच्या पुनर्विकासाचा प्रकल्प रखडलेला आहे. त्यात १९८५ साली गाळेधारकांचा गाळा ३० चौरस फुटांचा होता. त्याप्रमाणेच महापालिका प्रशासन भाडे आकारत आहे. मात्र परवान्यावर २३ चौरस फुटांची नोंद करून महापालिका गाळेधारकांची फसवणूक करत आहे. परिणामी, महापालिका प्रशासनाने नव्या इमारतीत वाढीव क्षेत्रफळाचा फायदा करून देत गाळेधारकांना ५० चौरस फुटांचे गाळे देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या वेळी स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या वेळी चौधरी यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान पुनर्विकासाच्या कामास सुरुवात करू, असे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमदारांच्या आश्वासनांवर टीका केली आहे. गेल्या २० महिन्यांपासून गाळेधारकांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक, आमदार आणि खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र तरीही प्रश्न मार्गी लागत नसून हे सेनेचे अपयश असल्याची टीका मनसेचे शाखाध्यक्ष नीलेश इंदप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Shirodkar Mandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.