Join us

'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:02 PM

गजानन कीर्तिकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिंदे गटातील नेत्याने केली आहे.

Gajanan Kirtikar : माजी खासदार आणि शिवसेना नेते गजानन कीर्तिकर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीत मुलगा अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र असं असले तरी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याबाबत कीर्तिकरांनी धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आता पक्षातून त्यांच्याविरोधात नाराजी जाहीर केली जात आहे. गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

 शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी वक्तव्यं केल्याप्रकरणी त्वरीत शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी केली आहे. यावर आता प्रत्युत्तर देताना कीर्तिकर यांनी पक्षाच्या बैठकीत मी पक्षाविरोधात जाणार नाही असं सांगितलं होतं. पण आता कोणीतरी चुगली, संशय व्यक्त करणार असेल तर ते मला चालणार नाही, असं म्हटलं आहे.

काय म्हटलंय पत्रात?

"मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत:च्या प्रचारासाठी, विकास कामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा," असे शशिकांत शिदे यांनी पत्रात म्हटलं आहे.

याबाबत झी २४ तासशी बोलताना गजानन कीर्तिकर आणि शिशिर शिंदे यांनी भाष्य केलं आहे. जर कोणाकडून संशय व्यक्त केला जात असेल तर मला पर्वा नाही, असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे. तर शिशिर शिंदे यांनी यावर प्रत्युत्तर देताना, "कीर्तिकरांनी शिवसैनिकांसमोर आदर्शवत वागलं पाहिजे. आम्हाला तशी अपेक्षा आहे. मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंनी अमोल किर्तीकर यांना आमिषं दाखवली, विधान परिषद देतो असं सांगितलं. आपल्या नेत्याची बदनामी कशाला करायची. शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असं शिवसेनेच्या नेत्यांनी वागू नये," असं म्हटलं आहे.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४गजानन कीर्तीकरएकनाथ शिंदेशिवसेनाअमोल कीर्तिकर