Join us

शितल म्हात्रेंना शिवसेनेत मोठी जबाबदारी; वरिष्ठांनी दाखवला विश्वास, मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 6:27 PM

शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या म्हणून शिल म्हात्रेंना संधी देण्यात आली.

मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले असून अनेकांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातही अनेकांना संधी मिळाली. त्यात, आमदार अंबादास दानवे यांना थेट विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होता आले. तर, नव्यानेच पक्षात आलेल्या सुषमा अंधारेंना थेट उपनेतेपदाची संधी मिळाली. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातही काहींना नव्याने जबाबदारी मिळाली आहे. त्यापैकी, एक म्हणजे शिवसेनेच्या माजी नगरसेविकास शितल म्हात्रे.

शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या म्हणून शिल म्हात्रेंना संधी देण्यात आली. शितल म्हात्रे यांनीही सातत्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आणि ठाकरे कुटुंबीयांवर हल्लाबोल करत प्रवक्तेपदाची जबाबादारी अशी पार पडली. आता, शितल म्हात्रेंना शिंदे गटाकडून संघटनेत काम करण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. स्वत: म्हात्रे यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेना विभागीय संपर्क नेतेपदी (कार्यक्षेत्र - कोकण विभाग) नियुक्ती करण्यात येत आहे.सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण, तसेच आपण सक्रीयपणे पक्षाचा प्रचार आणि प्रसार कराल. शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे, अशा आशयाचे पत्र म्हात्रेंना देण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक महिन्यातील संपर्क कार्याची जबाबदारीही देण्यात आली असून त्याचा अहवाल सादर करण्याचेही बजावण्यात आले आहे. म्हात्रे यांनी या निवडीबद्दल वरिष्ठांचे आभार मानले आहेत.     

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेना विभागीय संपर्क नेते पदी (कार्यक्षेत्र – कोकण विभाग) माझी नियुक्ती करण्यात आली आहे. माझ्या कामावर विश्वास दाखवल्याबद्दल शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी व निलमताई गोऱ्हे यांची मन:पूर्वक आभारी आहे. शिवसेना पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन, असेही शितल म्हात्रे यांनी पत्र स्वीकारल्यानंतर म्हटले. 

दरम्यान, नुकतेच झालेल्या शिवसंकल्प अभियान - मिशन ४५ अंतर्गत कोकणातील राजापूर येथील शिवसेनेच्या महाप्रचंड मेळाव्यात शितल म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्यासमवेत काम केले होते. 

टॅग्स :शिवसेनामुंबईएकनाथ शिंदेनीलम गो-हे