मुंबई: ८ मार्च हा जागतिक महिला दिन लवकरच येत आहे. संपूर्ण जगातल्या देशांमध्ये महिलांच्या अधिकारांच्या प्रश्नावरती स्त्रियांच्या स्फुर्तीदायक अशा चळवळीची सुरुवात झाली असे हे महिला दिनाचे महत्त्व आहे. १९०८ व १९१० साली जगाच्या विविध देशांमध्ये श्रमिक महिलांनी एकत्र येऊन स्वतःच्या रोजगारासाठी, स्वतःच्या आर्थिक विकासासाठी, एकत्रित येऊन सरकारकडे मागणी केली की आम्हाला चांगल्या प्रकारचे व्यवसाय व काम मिळाले पाहिजे.
८ मार्च च्या निमित्ताने अनेक कार्यक्रम वेगवेगळे घेतले जातात. जागतिक महिला दिनाच्या सोबत १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना महिला सेनेच्या वतीने दि, ९ मार्च रोजी संध्याकाळी ५ ते ९ या दरम्यान शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन षण्मुखानंद सभागृह , सायन, मुंबई येथे केलेले आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती आणि अनेक वर्ष विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम केलेल्या शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संमेलनाचे संयोजन केलेले आहे. या संमेलनास स्वतः शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत.या संमेलनाला शिवसेना पदाधिकारी मीना कांबळी, मनिषा कायंदे , कला शिंदे, शीतल म्हात्रे , आशा मामेडी, सुवर्णा कारंजे, शिल्पा देशमुख , तृष्णा विश्वासराव व इतर सर्व महिला सेनेच्या पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिला मतदारांना लागणाऱ्या नागरिक सुविधा, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता यासाठी सरकारने जे प्रयत्न केले त्याची माहिती देणे हा एक या संमेलनाचा हेतू आहे. त्यासोबत स्त्रियांच्या अडचणीमध्ये व नैसर्गिक आपत्तीमध्ये शिवसेनेने सातत्याने मदत कार्य केलेले आहे.त्या पार्श्वभूमीवर या मदतीचा फायदा होत असताना आरोग्य विषयक सेवा, महिला बचत गट, त्याचबरोबर लेक लाडकी योजना, मातृत्व वंदन योजना,आनंदाचा शिधा योजना, वयोश्री योजना,शेतकरी महिलांसाठी म्हणून उभारी या सारख्या उत्तर महाराष्ट्रात राबवलेल्या योजना, मुलींच्या साठी उच्चतंत्र शिक्षणामध्ये फी माफी करणे असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत.त्याचबरोबर चौथ्या महिला धोरणाला सुद्धा वेग देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहोचवणं हे या संमेलनाचा एक मुख्य हेतू आहे. या दृष्टिकोनातून महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या कामातील तसेच महिला लोकप्रतिनिधींच्या कामातील यशोगाथा संमेलनात मांडल्या जातील. त्यासोबत शिवसेना महिला सेनेचे कार्य आणि त्याला सामोरे जात असताना प्रयत्नांची दिशा यावरही चर्चा होईल.
सरकारच्या योजना किंवा विकासाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ठिकठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत आपण कसं पोहोचायचं याबद्दल देखील अनुभवी महिला अधिकारी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये शिवसेनेचे सर्व नेते आणि उपनेते आणि मुंबईच्या महिला विभागप्रमुख, महिला संपर्कप्रमुख, महिला उपविभाग प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे आणि श गजानन पाटील या कार्यक्रमाला लागणारी माहिती व त्याचबरोबर संयोजन व त्यासाठी लागणारा समन्वय करणार आहेत.