शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:26 AM2020-02-05T03:26:19+5:302020-02-05T06:24:20+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती की शिवसेना दरवर्षी तिथीनुसार साजरी करते पण ती तारखेनुसारच साजरी करावी.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती की शिवसेना दरवर्षी तिथीनुसार साजरी करते पण ती तारखेनुसारच साजरी करावी, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर आता ठाकरे काय भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे.
राज्य शासन तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करते. मात्र, देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये १९ फेब्रुवारीला राज्य शासन शिवजयंती साजरी करीत असताना शिवसेनेने त्या विरोधात भूमिका घेतली होती. शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली होती.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक ट्विट केले. ‘मला पटले तुम्हाला पण पटतेय ना? तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीला तारखेनुसारच शिवजयंती साजरी करा’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यास सातत्याने विरोध करणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आता मुख्यमंत्री आहेत. येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शासकीय समारंभात ते उपस्थित राहतील का? की सरकार म्हणून तारखेनुसार आणि शिवसेना म्हणून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची भूमिका घेतील या विषयीदेखील उत्सुकता आहे.
शिवसैनिकांना आवाहन करा - मेटे
नाशिक : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारीलाच साजरी केली जात असून, दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरीवर शिवरायांना अभिवादन करून शिवजयंती साजरी करतात. त्यामुळे यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९ फेब्रुवारीला शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाच शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही तारखेप्रमाणेच शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.