- मनोहर कुंभेजकर
मुंबई : अरबी सुमुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली असतानाच, अंधेरी पूर्व सहार वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यानजीक आणि विलेपार्ले (पूर्व) पश्चिम दुर्तगती महामार्गावर हनुमान रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात शिजयंतीनिमित्त सुशोभीकरण करण्याचा या दोन्ही पुतळ्याची देखभाल करणाऱ्या जिव्हीके कंपनीला विसर पडला. शिवसेना भाजपाच्या आमदार व नगरसेवकांनी येथे पाठ फिरवली अशी टीका वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अॅड. ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली. गेल्या पालिका निवडणुकीपूर्वी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. शिवजयंतीच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते.
दरम्यान, आज सकाळी सहार गावातील 100 शिवप्रेमी व वॉचडॉग फाउंडेशन यांनी संयुक्तपणे सहार परिसरातील मार्केट, पाचपाखाडी मार्गे येथील वेअर हाऊस येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याया पुतळ्यापर्यंत बँडच्या निनादात शोभायात्रा काढली.छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे ठेऊन शिवप्रतिमेला पुष्पहार घातला.
पश्चिम दुर्तगती महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा ऊन व पाऊस झेलत आहे.त्याच्या डोक्यावर साधी संरक्षणासाठी छत्री देखिल नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. लोकमतने सातत्याने हा विषय मांडल्याचे त्यांनी सांगितले. जर राज्य सरकार व जिव्हीके कंपनी येथे छत्री बसवत नसेल तर वॉचडॉग फाउंडेशन स्वतः खर्च करून छत्री बसवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम उभारण्याची मागणी त्यांनी केली.