मुंबई-
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी (Mumbai Drugs Case) आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाल्यानंतर आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगेलच चर्चेत आहेत. नवाब मलिकांकडून वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना दुसऱ्या बाजूला आता वानखेडे यांच्या समर्थनार्थ देखील काही संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. मुंबईतील एनसीबी कार्यालयाबाहेर आज शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान नावाच्या संघटनेनं वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नव्हे, तर समीर वानखेडे कार्यालयात दाखल होत असताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तसंच वानखेडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा जंगी सत्कार देखील करण्यात आला.
'समीर वानखेडे तुम आगे बढो...हम तुम्हारे साथ है', 'हर हर महादेव' या घोषणांनी एनसीबी कार्यालयाबाहेर शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वानखेडेंचा सत्कार केला. तसंच ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई करुन समीर वानखेडे चांगलंच काम करत आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम काही जण करत आहेत. पण आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहोत, असं शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यानं सांगितलं.
समीर वानखेडे यांनीही शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केलेला सत्कार स्वीकारला आणि त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी वानखेडेंनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यलयीन वेळेत एनसीबीच्या कार्यालयात पोहोचले.
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज समीर वानखेडे यांच्यावर नवनवे आरोप करण्यात येत आहेत. नुकतंच मलिक यांनी समीर वानखेडे परिधान करत असलेले कपडे आणि घड्याळांची किंमत ५ ते १० कोटींच्या घरात असल्याचा गौप्यस्फोट केला होता.
समीर वानखेडेंनी गेल्या महिन्याभरात ५ ते १० कोटींचे कपडे वापरले आहेत, असा दावा मलिक यांनी केला. वानखेडे २ लाखांचे बूट, ७० हजारांचे शर्ट, ३० हजारांचे टी-शर्ट, १ लाखाची पँट वापरतात. ते वापरत असलेल्या घड्याळ्यांची किंमत २० लाखांपासून १ कोटीपर्यंत आहे, असा खळबळजनक दावा मलिक यांनी केला होता. त्यावर समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मलिक यांनी खरंतर लोखंडवाला मार्केटमध्ये जावं आणि कपड्यांची किमतीची माहिती करुन घ्यावी. माझ्या महागड्या कपड्यांची केवळ अफवा आहे. मलिकांनी खरी माहिती शोधून काढावी", असं वानखेडे म्हणाले होते.
नवाब मलिक यांच्याविरोधात खटला दाखल होणार?नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं समीर वानखेडे यांच्याबाबत आरोप करत आहेत. वानखेडे दलित नसून ते मुस्लिम आहे आहेत आणि त्यांनी खोटा जातीचा दाखला दाखवून नोकरी मिळवली असा आरोप मलिक यांनी केला होता. याच आरोपांसंदर्बात आता समीर वानखेडे सक्रिय झाले आहेत. त्यांनी नुकतीच अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय साम्पला यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रं त्यांच्याकडे सादर केली आहेत. यात वानखेडे यांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात लवकरच खटला दाखल करणार असल्याचंही वानखेडे यांनी म्हटलं आहे.