मुंबई : आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी निर्गमित करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे.
शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या दिनाच्या सोहळ्यानिमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. या बोधचिन्हाचा वापर सर्व शासकीय कार्यक्रमाचा प्रचार व शासकीय पत्रव्यवहारात कटाक्षाने करण्यात यावा.
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात हे बोधचिन्ह लावावे. मंत्रालय तसेच अन्य प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अखत्यारितील क्षेत्रीय कार्यालयांना या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात असे या आदेशात म्हटले आहे.
छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा यामागील उद्देश असल्याचे सांस्कृतिक विभागाकडून सांगण्यात आले आहे. या आदेशामुळे लवकरच सर्व शासकीय पत्रांमध्ये शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या सोहळ्यानिमित्त जारी केलेले बोधचिन्ह दिसणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांवरही हे दिसणार आहे.