मुंबई: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीवर (Motoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. यातच रवी राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा घराबाहेर पडणार असल्याचे समजताच शिवसैनिक आक्रमक झाले. राणा यांच्या इमारतीसमोरील बॅरिकेटिंग तोडून आत जाण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. मात्र, पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले असून, तणाव कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
रवी राणा यांच्या घराबाहेर शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते जमले होते. राणा दाम्पत्य घराबाहेर पडणार असल्याचे समजताच ते कमालीचे आक्रमक झाले. तसेच ९ वाजून गेले तरी राणा दाम्पत्य बाहेर पडत नाहीएत. ते बहुतेक घाबरल्याचे दिसत आहेत. शिवसेनेशी घेतलेला पंगा राणा दाम्पत्याला महागात पडेल. आम्ही राणा दाम्पत्याला सोडणार नाही. अमरावतीतून मुंबईत येऊन आम्हाला शिकवणार का, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या.
मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी
सकाळपासूनच रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी शिवसैनिक जमा झाले असून, ती गर्दी वाढत चालल्याचे दिसत आहे. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. रात्रभर शिवसैनिकांचा मातोश्रीवरील ओघ सुरूच होता. मध्यरात्रीपासूनच शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर गर्दी जमा झाल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी मध्यरात्री मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. यावेळी जेवणाची आणि पाण्याची तेजस ठाकरे यांनी विचारपूस केल्याची माहिती देण्यात आली आहे.