Join us

'एकनाथ शिंदे येणार म्हणून हार-तुरे आणून ठेवले होते, पण...'; किशोरी पेडणेकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 5:28 PM

महापालिकेमधील शिवसेना पक्षाच्या कार्यालयात येतील, असं वाटलं होतं. मात्र ते आले नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

मुंबई- मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (५ जुलै) रोजी भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले २४ तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. त्यानंतर आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील महापालिकेत जाऊन उपाययोजनेबाबत पाहणी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला किशोरी पेडणेकर यांनी आज भेट देऊन मुंबईतील पावसाची स्थिती व करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबतचा एकंदरीत आढावा घेतला. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. एकनाथ शिंदे काल मुंबई महापालिकेत आले होते. त्यावेळी ते महापालिकेमधील शिवसेना पक्षाच्या कार्यालयात येतील, असं वाटलं होतं. मात्र ते आले नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

एकनाथ शिंदे येणार म्हणून हार-तुरे आणून ठेवले होते. एकनाथ शिंदे हे एक शिवसैनिक मुख्यमंत्री असल्याचं सांगतात, म्हणून ते शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात येतील, असं वाटलं होतं. मात्र ते शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या महानगर पालिकेमधील पक्ष कार्यालयात आले नाहीत. ते भाजपाच्या कार्यालयात गेले. हार-तुरे फुकट गेल्याचं दु:ख नाही. परंतु शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत होतो, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच पुढील चार ते पाच मान्सून सक्रीय राहील; आणि त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांना अतिवृष्टी तर काही जिल्हयांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पंढरी वारीच्या उत्तर्धातील शेवटच्या टप्प्यातही वारकऱ्यांनाही कदाचित या ५ दिवसात  काहीशा मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यताही आहे.

अतिवृष्टीची नोंद-

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात किनारपटटी ते कर्नाटक किनारपटटीपर्यंत द्रोणीय क्षेत्र आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ब-याच ठिकाणी पाऊस पडला आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेकिशोरी पेडणेकरशिवसेनामुंबई महानगरपालिकापाऊस