Join us

शिवसैनिक व राणे समर्थक एकमेकांना भिडणार, शिवसेनेचे जुहूसह मुंबईत करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:30 AM

Shiv Sainiks and Rane supporters : शिवसेनेच्या प्रत्येक विभागात राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेतर्फे आज दुपारी आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसे आदेश शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांना पक्ष श्रेष्टींकडून देण्यात आले आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक चांगलेच संतप्त व आक्रमक झाले आहेत. तसेच, मुंबईतील जुहू येथे राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही असे ट्विट केले आहे. त्यामुळे शिवसैनिक व राणे समर्थक एकमेकांना भिडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या प्रत्येक विभागात राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेतर्फे आज दुपारी आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसे आदेश शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांना पक्ष श्रेष्टींकडून देण्यात आले आहे. विभाग क्रमांक 1 तर्फे विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस बोरिवली पूर्व ओंकारेश्वर मंदिरा समोर आंदोलन करणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू तारा रोडवर अतिश बंगला आहे.

युवासैनिकांनी मोठ्या संख्येने आज दुपारी जुहू येथे जमून त्यांच्या बंगल्यावर कूच करणार आहेत . काल रात्री पासून असे आदेश पक्षाने युवासैनिकांना दिले आहेत. प्रत्येक युवासैनिक आज दिसला पाहिजे! मुंबई आपल्या साहेबांची हे दाखवायची आज वेळ आली आहे अशी पोस्ट शिवसेनेच्या अनेक वॉट्सअप ग्रुपवर फिरत आहे. तर राणे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने जुहू येथील बंगल्यावर जमावे असे वरिष्ठांकडून तोंडी आदेश आम्हाला आज सकाळी देण्यात आले अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली. त्यामुळे जुहू येथे शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार अशी शक्यता आहे.

दरम्यान राणे यांच्या बंगल्या बाहेर आणि जुहू तारा रोड परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे की, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार अशी दाट शक्यता आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला.आणि यावरून शिवसैनिक,युवासैनिक कमालीचे संप्तत झाले आहेत.

टॅग्स :नारायण राणे शिवसेना