Join us

‘मातोश्री’ बाहेर शिवसैनिक जमले, राणा दाम्पत्य मुंबईत पोहचले; तणाव वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:48 PM

खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारकडून असलेली वाय दर्जाची सुरक्षा न घेता राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याचं समोर आले आहे.

मुंबई – राज्यात हनुमान चालीसावरून राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही भागात भोंग्यावरून हनुमान चालीसा लावली. मात्र त्या वादात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केले.

आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान दिले. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्री बाहेर जमा झाले. राणा दाम्पत्याने शिवसेनेला डिवचू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. मात्र आपण गनिमी काव्याने मातोश्रीवर येणारच असं रवी राणा यांनी म्हटलं होते. त्यामुळे शिवसैनिक पुन्हा मातोश्री जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राणा दाम्पत्य शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईत दाखल झाल्याची बातमी येताच शिवसैनिक मातोश्री बाहेर जमा झालेत. खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारकडून असलेली वाय दर्जाची सुरक्षा न घेता राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय. रवी राणा दाम्पत्य कार्यकर्त्यांसह मुंबईत येणार असल्याने रेल्वेची तिकीटं सुद्धा काढण्यात आली होती. तेव्हा शिवसैनिकांनी अमरावती स्टेशनला राणा दाम्पत्यांना रोखण्याची रणनीती आखली. परंतु राणा दाम्पत्य आता मुंबईत पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.

भाजपाला सी ग्रेड नटांची गरज

रवी राणा दाम्पत्य मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या इशाऱ्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, अलीकडच्या काळात भाजपानं हिंदुत्वाची नौटंकी सुरू केली आहे. राणा दाम्पत्य त्यातील पात्रं आहेत. हे बंटी बबली मुंबईत पोहचले त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. शिवसेनेला हिंदुत्व माहिती आहे. रामनवमी, हनुमान चालीसा हा स्टंटचा भाग नसून श्रद्धेचा भाग आहे. मुंबई पोलीस आणि शिवसैनिक यांना तोंड देण्यास सक्षम आहेत. भाजपाला सी ग्रेड नटांची गरज भासतेय असा आरोप करत राऊतांनी राणा दाम्पत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

टॅग्स :रवी राणानवनीत कौर राणाशिवसेना