शिवसैनिक भिडणारच... मुख्यमंत्र्यांची तुलना औवेसींसोबत; व्हिडिओ शेअर करत राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:34 PM2023-11-16T22:34:41+5:302023-11-16T23:51:00+5:30

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवितर्थवर जाऊन अभिवादन केले.

Shiv Sainiks will clash... Chief Minister Eknath Shinde is compared with Owaisi, Sanjay Raut gets angry after rally on Shivtirtha | शिवसैनिक भिडणारच... मुख्यमंत्र्यांची तुलना औवेसींसोबत; व्हिडिओ शेअर करत राऊत कडाडले

शिवसैनिक भिडणारच... मुख्यमंत्र्यांची तुलना औवेसींसोबत; व्हिडिओ शेअर करत राऊत कडाडले

मुंबई - शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्याचे दिसून आले. दरम्यान, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याने शिवसेना नेत्यांनीही घटनास्थळी भेट दिली. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यानी ट्विट करत व्हिडिओही शेअर केला आहे. यावेळी, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना, त्यांना अफलजखानाची पिलावळं असं म्हटलं आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थावर जाऊन अभिवादन केले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. यावरुन, दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याने शिवतिर्थ मैदानावर मोठा गोंधळ उडाला होता. त्यावेळी, पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवल्याचे दिसून आले. मात्र, या वादावेळी दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, संजय राऊत यांनी व्हिडिओ ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृती स्थळ पवित्र आहे. त्याचे पावित्र्य राखायला हवे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मृतीस्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाही. त्याप्रमाणे  शिवतीर्थावर स्मृतीस्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्य भंग होईल. शिवसैनिक एका निष्ठेने भिडणाराच!
जय महाराष्ट्र! , असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना आमदार अकबरुद्दीन औवेसींसोबत केली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

अनिल देसाईंची घटनास्थळी भेट

शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल देसाई यांनी म्हटले. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या स्थानाचे पावित्र्य भंग करायचे नाही, असेही त्यांनी म्हटले. 
 

Web Title: Shiv Sainiks will clash... Chief Minister Eknath Shinde is compared with Owaisi, Sanjay Raut gets angry after rally on Shivtirtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.