Join us  

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे पुन्हा सक्रीय! बेकायदा सरकारमुळेच मुंबईची विकासकामे रखडली; शिंदे-भाजपवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 8:08 AM

Maharashtra Political Crisis: तात्पुरत्या बेकायदा सरकारमध्ये मुंबईचा आवाज कुठेच नसून विकासावर नाही तर राजकारणावर फोकस केला जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्रीपद गेल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठकांचा सपाटा लावताना दिसत आहेत. यातच मध्यंतरी आजारी असलेले आदित्य ठाकरे पुन्हा कामाला लागले असून, प्रकल्प कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

शिवडी ते रायगडमधील न्हावा-शेवा बंदराला जोडणारा २२ किमी लांबीचा हा हिंदुस्थानातील पहिला सर्वांत मोठा समुद्री पूल म्हणून ओळखला जाणार आहे. मुंबईची वाहतूक सुरळीत आणि वेगवान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई पारबंदर प्रकल्प कामाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाच्या ‘एमटीएचएल’ प्रकल्पातील पहिला गर्डर तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी २०२२ रोजी टाकण्यात आला होता. या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक टप्प्यावर आपण लक्ष ठेवून आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

बेकायदा सरकारमुळेच मुंबईची विकासकामे रखडली

महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र सध्या असलेल्या ‘बेकायदा’ सरकारच्या ‘स्थगिती’ धोरणामुळेच मुंबईतील विकासकामे रखडली असल्याचा घणाघात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नव्या सरकारवर केला. सध्याच्या ‘तात्पुरत्या’ सरकारमध्ये मुंबईचा आवाज कुठेच नसून विकासावर नाही तर राजकारणावर ‘फोकस’ केला जात असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. तसेच काही नतद्रष्ट मंडळींच्या कपटी कारस्थानामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले असले तरी आम्ही घेत असलेल्या साप्ताहिक बैठकी आणि मासिक पाहणी दौरे यामुळे २०२० पासून आतापर्यंत या प्रकल्पाचे जवळपास ५५ टक्के काम पूर्ण झाले. आज सत्तेमध्ये मुंबईला प्रतिनिधित्व नसले तरी आम्ही मुंबईसाठी नेहमीच आवाज उठवत राहू, असे आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिले. 

दरम्यान, मुंबईची वाहतूक सुरळीत आणि वेगवान करण्यात मुंबईच्या पूर्व किनाऱ्याला पश्चिम किनाऱ्याशी जोडणारा वरळी-शिवडी कनेक्टर महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी पुढाकार घेण्यापासून दर आठवड्याला त्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रगती पाहताना मला खूप आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही पायाभूत प्रकल्पाचे स्वप्न पाहणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये शाश्वत विकास, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि कमीत कमी अडथळे, हे जबाबदारीचे प्रमुख टप्पे आहेत. या सर्व जबाबदाऱ्या आपण पूर्ण केल्याबद्दल समाधान वाटत असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळआदित्य ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस