Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी मोदी सरकारची चौकशी करणार की अग्रवालांची? आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 09:44 PM2022-09-17T21:44:40+5:302022-09-17T21:45:17+5:30
Maharashtra News: राज्यातील मुलांनी काय चूक केली, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं हा आपल्या देशात गुन्हा झालाय का, असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.
Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्याचे समोर येताच राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाल्याचे दिसले. यानंतर गेले सलग काही दिवस विरोधी महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. यात भाजप नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात चौकशी करण्यासंदर्भात विधान केले होते. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावर पलटवार केला असून, वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणात केंद्र सरकारची चौकशी करणार की, अग्रवाल यांची करणार, असा प्रतिप्रश्न केला आहे.
महाराष्ट्रासाठी कोणी काही बोलायला लागले की त्याच्यावर आरोप करायचे, त्याची बदनामी करायची, त्याच्या चौकशीची मागणी करायची. म्हणजे महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणे हा आपल्या देशात गुन्हा झालाय का? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित त्यांना अभिवादन करण्यासाठी आदित्य ठाकरे माहीममध्ये होते. यावेळी फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे-भाजप सरकारसह आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
माझे घरचे संस्कार सांगतात की सत्य बोल
माझे घरचे संस्कार सांगतात की सत्य बोल. मी त्यांच्यावर लक्ष देत नाही, असा टोला लगावत आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांचे नाव घेणे टाळले. माझ्या पणजोबांची जयंती आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो. माझ्या पणजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला होता, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी पणजोबांच्या आठवणी सांगितल्या.
चौकशी कोणाची करणार?
वेदांत-फॉक्सकॉनबाबत चौकशी केली पाहिजे, या आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. चौकशी कोणाची करणार? केंद्र सरकारची करणार की? अग्रवाल यांची करणार? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का? या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना, महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे? इथून प्रकल्प तिथे गेला याचे कोणाला दुःख नाही, असे सांगत आदित्य ठाकरेंनी खंत व्यक्त केली.
दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यावर सत्ताधारी अपयशाचे खापर आमच्यावर फोडत आहेत. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी खूप आम्ही महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.