मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतलेले अनेकविध निर्णय बदलण्याला किंवा स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. यातील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा हा आरे कारशेडचा असून, यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे.
राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले जात आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचे कारण नव्हते. शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकार मुंबईच्या हिताचा विचार करणारे होते
महाविकास आघाडीचे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे होते. आम्ही ८०८ एकर जंगल घोषित केले होते. हे करत असताना आदिवासींचे हक्क बाधित ठेवण्यात आले होते. कारशेड आपण कांजूरला नेण्याचा प्रयत्न करत होतो. कारशेड रोज लागत नाही. चार ते पाच महिन्यातून एकदा त्याचा वापर होतो. आधीचे प्लानिंग चुकीचे होते. कांजूरमार्गची जागा मेट्रो ६ ला द्या असे सरकार केंद्राला सांगत आहे. मेट्रो ६ सोबत अनेक मेट्रो लाईन कारशेडविना बांधायला घेतल्या होत्या. आरे जंगल असून हा फक्त झाडांचा प्रश्न नाही, तर इथे अनेक प्राणी येतात. सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधात होता. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हेच सांगणे आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, मुंबईने नेहमीच शिवसेनाला साथ दिली आहे. आरेवरील, मुंबईवरील आमचे प्रेम यावर राग ठेवूनच हा निर्णय घेतलाय का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. हे सरकार स्थगिती सरकार होणार का? स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होणार आहे याबद्दल विचार करावा लागेल. सरकार बदलले म्हणून स्थगिती देणे हे योग्य नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.