Union Budget 2024: महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे म्हणून ही वागणूक?; आदित्य ठाकरे बरसले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 03:29 PM2024-07-23T15:29:04+5:302024-07-23T15:30:42+5:30

आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राची उपेक्षा करण्यात आली असल्याचं सांगत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

shiv sena Aditya Thackeray criticizes union budget 2024 and state government | Union Budget 2024: महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे म्हणून ही वागणूक?; आदित्य ठाकरे बरसले

Union Budget 2024: महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे म्हणून ही वागणूक?; आदित्य ठाकरे बरसले

Aditya Thackeray ( Marathi News ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं जात असून विरोधकांकडून मात्र टीकेचे बाण सोडले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राची उपेक्षा करण्यात आली असल्याचं सांगत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आजच्या भाजपप्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला गेल्याचं दिसलं नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्राला ही वागणूक का? महाराष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर राखत तुमच्या संविधानविरोधी सत्तेला आळा घातला म्हणून? की महाराष्ट्राची जनता अजूनही स्वाभिमानी आहे म्हणून? की महाराष्ट्रावर यांचा जुना आकस आहे म्हणून?" असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश या एनडीच्या घटकपक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, "बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांचा वाटा नक्की द्या, पण महाराष्ट्र सर्वात मोठा करदाता असूनही भाजपाचा महाराष्ट्रावर एवढा राग कशासाठी?" असा सवाल आदित्य यांनी केला आहे.

राज्यातील नेत्यांवर टीकास्त्र

आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त करताना राज्यातील महायुतीतील नेत्यांना लक्ष्य केलं आहे. "महाराष्ट्रातल्या ट्रिपल इंजिन सरकारला आपल्या राज्यासाठी या बजेटमधून काय मिळवता आलंय? ना विशेष पॅकेज, ना निधी, ना हक्काचा वाटा! मिंधे राजवटीला फक्त दिल्लीसमोर लाचारी पत्करायला, महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात पाठवायला, प्रचंड भ्रष्टाचार करुन राज्याची तिजोरी रिकामी करायला आणि फोडाफोडीचं राजकारण करायला जमतं! महाराष्ट्रासाठी केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचं भलं करण्याची धमकच यांच्यात नाही," असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Web Title: shiv sena Aditya Thackeray criticizes union budget 2024 and state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.