Andheri Bypoll 2022: “परंपरा आणि संस्कृतीची ती जाण भाजपने गेल्या दीड वर्षांत का ठेवली नाही?”; शिवसेनेने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 08:38 AM2022-10-19T08:38:50+5:302022-10-19T08:39:42+5:30
Andheri Bypoll 2022: अंधेरी पोटनिवडणुकीवरुन भाजपसही मन आहे व ते मोठे आहे हे दिसून आले, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
Andheri Bypoll 2022: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, अद्यापही सहा उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक होणारच आहे. यातच माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना गेले सलग काही दिवस भाजपवर जोरदार निशाणा साधत आहे. पुन्हा एकदा याचाच संदर्भ देत शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.
शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयानंतर भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. यानंतर आता शिवसेना अंधेरीतील विधानसभा पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच होती. २०१४ साली रमेश लटके भाजपशिवाय येथे जिंकले व २०१९ साली भाजपच्या युतीत जिंकले. म्हणजे हा मतदारसंघ स्वाभिमानी शिवसेनेस मानणारा आहे. आताही मतदानाच्या माध्यमातून तेथील लोकांच्या मनातील संताप, चीड व सहानुभूतीचा लाव्हा धगधगत्या मशालीसारखा उसळून बाहेर पडला असता, असे शिवसेनेने म्हटले जाते.
परंपरा, संस्कृतीची जाण भाजपने गेल्या दीड वर्षांत का ठेवली नाही?
‘परंपरा’ म्हणून सगळ्यांनी एकत्र बसून पहिल्यापासून निर्णय घ्यायचे असतात. राजकारणात मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊ नये ही महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन आधीच केले. राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्यास लटके यांच्या आत्म्यास शांती लाभेल असे पत्ररूपी आवाहन केल्यावर भाजपने त्या पत्राचा विचार केला. त्यामुळे भाजप व राज ठाकरे यांचे आभार मानायला हवेत. पण अंधेरी पोटनिवडणुकीत ज्या महाराष्ट्रीय परंपरा आणि संस्कृतीची जाण भाजपने ठेवली. तीच जाण गेल्या दीड वर्षात झालेल्या इतर पोटनिवडणुकांत का ठेवली नाही? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
महाराष्ट्र व जनता सर्वकाही जाणते
महाराष्ट्र व जनता सर्वकाही जाणते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणमैदानावरचा हा असा विजय आजच्या सरकारला, मिंधे गटाला व महाराष्ट्राच्या दुश्मनांना परवडला नसता हे मान्य करायलाच हवे. इतके घाव छातीवर आणि पाठीवर झेलूनही शिवसेना जिंकते, पुढे जाते याचा अर्थ उद्याचे भवितव्य हे आमच्या शिवसेनेचेच आहे. ठीक आहे. मैदानात आज नाहीतर उद्या उतरू, असे सांगत शिवसेनेने शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, सध्याच्या राजकारणात सगळे पाणी एकच आहे हे अंधेरी पोटनिवडणुकीतील घडामोडींनी दाखवून दिले. भारतीय जनता पक्षाने अंधेरी पोटनिवडणुकीतून मोठ्या मनाने माघार घेतली. त्यामुळे एक झाले, भाजपसही मन आहे व ते मोठे आहे हे दिसून आले. पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतात. ‘मन की बात’ करतात. म्हणजे मनाचा मनाशी संवाद होतो. तीच ‘मन की बात’ अंधेरी पोटनिवडणुकीच्या बाबतीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राखली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"