मीरारोड - मराठी भाषेत दुकानांच्या पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मराठी भाषेत पाटी नसलेल्या दुकानांच्या पाट्यांना शिवसैनिकांनी काळं फासलं आहे. मीरारोडच्या हटकेश भागात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. दुकान, आस्थापनांना मराठी भाषेत ठळकपणे नाव लिहिणं बंधनकारक आहे. मात्र अनेक दुकानदार मराठी भाषेत पाट्या लावत नाहीत. त्यांच्याविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठी भाषेतील पाट्यांसाठी शिवसेना, मनसे, मराठी एकीकरण समितीनं आधीपासून निवेदनं दिली होती. यासोबतच आंदोलनंदेखील केली होती. परंतु महापालिका प्रशासनानं मराठी भाषेत पाट्या न लावणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. या पार्श्वभूमीवर आज मीरारोडमधील हटकेश, जीसीसी क्लब परिसरात शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दुकानांवरील अमराठी पाटयांविरोधात आंदोलन सुरु केलं. शिवसैनिकांनी परिसरातील दुकानाच्या इंग्रजी भाषेतील पाट्यांना काळं फासलं. 'शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मराठी पाटयांसाठी ३० जूनची डेडलाइन दिली होती. आम्ही शिवसैनिकांनी आठ दिवस अगोदर येथील सर्व दुकान मालकांना मराठी पाट्ंयाबाबत सूचनाही दिल्या होत्या. पण कायद्यानं बंधनकारक असतानाही मराठी राजभाषेचा अवमान करण्याची मानसिकता असलेल्यांनी आपल्या दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत केल्या नाहीत. त्यामुळे आजपासून शिवसेना आंदोलन सुरु करत आहे,' असं महेश शिंदे यांनी सांगितलं.
दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी शिवसेना आक्रमक; इंग्रजी फलकांना फासलं काळं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 7:50 PM