शिवसेनेची समाजवाद्यांसोबत युती; भाजपचा उद्धव ठाकरेंवर 'विनोदी' शब्दात निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 08:02 AM2023-10-16T08:02:11+5:302023-10-16T08:03:52+5:30

शिवसेनेनं समाजवादी पक्षासोबत युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं होतं. २१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत येण्यास तयार झाले हे माझे भाग्य आहे.

Shiv Sena alliance with Socialists; BJP targets Uddhav Thackeray with 'humorous' words | शिवसेनेची समाजवाद्यांसोबत युती; भाजपचा उद्धव ठाकरेंवर 'विनोदी' शब्दात निशाणा

शिवसेनेची समाजवाद्यांसोबत युती; भाजपचा उद्धव ठाकरेंवर 'विनोदी' शब्दात निशाणा

मुंबई - २०१२ साली करुन दाखवलं या शब्दामुळे विरोधकांचा सुफडा साफ झाला. जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे विचित्र रसायन होते, एकमेकांसोबत टोकाने लढले. परंतु ती विचारांची लढाई होती. त्या दोघांची मैत्री कायम होती. जॉर्ज फर्नांडिसांचे एक वैशिष्ट होते. त्यांच्यासमोर उभं राहणाऱ्याचं डिपॉझिट जप्त व्हायचे. आम्ही लोकशाही वाचवणारच हे देशातील सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच देशातील लोकशाही वाचेल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षासोबत युती केल्यानंतर आता भाजपनेही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार शब्दात निशाणा साधला. तसेच, हा सर्वात मोठा विनोद असल्याचंही भाजपाने म्हटलंय.

शिवसेनेनं समाजवादी पक्षासोबत युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं होतं. २१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत येण्यास तयार झाले हे माझे भाग्य आहे. आपली लढाई ही व्यक्तिगत नव्हती, तर विचारांची होती. आज आपण सगळे एकत्र जमलोय, जुन्या आठवणींना उजाळा देतोय. आता एका वळणावर उभे आहोत. कार्यकर्ता हा आपला कणा आहे. आमच्या संघटनेत गटप्रमुख सगळ्यात महत्त्वाचा असतो. तळागळापासून वरपर्यंत एक जिद्द असेल तर लढाई जिंकता येते. आम्ही भाजपासोबत २५ वर्ष एकत्र होतो, मग दूर का झालो? मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. सत्ता येताना सगळे जवळ येतात. परंतु सत्ता नसताना जे येतात ती खरी मैत्री, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं. त्यावर, आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 

घराणेशाहीच्या जीवावर पद उपभोगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आज कथित समाजवाद्यांसोबत येऊन लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारल्या. हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारू नयेत, असे म्हणत भाजपने पलटवार केला आहे. तसेच, सत्तेत असताना अडीच वर्षे जे उद्धव ठाकरे घरात बसून होते ते उद्धव ठाकरे मोदीजींनी गेल्या साडेनऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत आणि होऊ दे चर्चा म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांना चर्चा करायचीच असेल तर १०० कोटी वसुली, कोविड काळातील घोटाळे, पत्राचाळ घोटाळा, वाझे की लादेन?, यावर एकदा चर्चा होऊन जाऊ द्या, असे आव्हानही भाजपकडून देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगितल्या आठवणी

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसांनी एकत्र येत साथ दिली तर महाराष्ट्राची ताकद काय हे दिसून येईल. कामगारांचे हित हा शरद राव आणि आमच्यातील एक समान धागा होता. आमच्याकडे महापालिका होती, कामगारांच्या हितासाठी आम्ही एकत्रित मधला मार्ग काढायचो. आज देशासमोर अंधार आहे. आणीबाणीच्या काळात अंधेरे मे जयप्रकाश म्हटलं जायचं. तसं आता आपल्याला व्हायचे आहे. शिवसेना-समाजवादी सुरुवातीला एकत्र होते, त्यानंतर बरीच वर्ष दुरावलो. त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने विचार करायला तुम्ही सोबत आला त्याबद्दल ठाकरेंनी धन्यवाद म्हटलं.

सगळे समाजवादी विचारांचे मला कुटुंबप्रमुख मानतात यावर मला अजूनही विश्वास बसत नाही. माझा उल्लेख करताना माजी मुख्यमंत्री केला गेला, मला मुख्यमंत्री आजी-माजी काय मानता यापेक्षा तुम्ही कुटुंबप्रमुख मानता याचे महत्त्व आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही कोरोना काळातील टॅगलाईन होती. आज मला महात्मा फुलेंची पगडी आणि घोंगडी दिली. मी ती हातात द्यावी असं म्हटलं. कारण पगडी पेलवण्यासाठी डोकं असावं लागते. आज रिकामी डोकी खूप आहेत. त्या टोपीखाली दडलंय काय असं होते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

२१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत आले हे माझे भाग्य

शिवसेनाप्रमुख मला नेहमी म्हणायचे, उद्धव एक लक्षात ठेव, केवळ तू लोकांना आवडावा म्हणून खोटा मुखवटा घालू नकोस. मी जसा आहे तसा आहे, एकतर स्वीकारा अन्यथा नकारा. मी त्यारितीने पुढे जातो. २१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत येण्यास तयार झाले हे माझे भाग्य आहे. आपली लढाई ही व्यक्तिगत नव्हती, तर विचारांची होती. आज आपण सगळे एकत्र जमलोय, जुन्या आठवणींना उजाळा देतोय. आता एका वळणावर उभे आहोत. कार्यकर्ता हा आपला कणा आहे. आमच्या संघटनेत गटप्रमुख सगळ्यात महत्त्वाचा असतो. तळागळापासून वरपर्यंत एक जिद्द असेल तर लढाई जिंकता येते. आम्ही भाजपासोबत २५ वर्ष एकत्र होतो, मग दूर का झालो? मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. सत्ता येताना सगळे जवळ येतात. परंतु सत्ता नसताना जे येतात ती खरी मैत्री. भाजपाला मैत्री जमली नाही. दुसऱ्याला मोठा होऊ द्यायचा नाही. शिवसेना-भाजपा युती फोडायचे कारण काय होते? असा सवाल ठाकरेंनी विचारला.

तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय?

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूवर फुलांचा वर्षाव भाजपा करू शकत असेल तर मी शिवसेना म्हणून समाजवादीशी का बोलू शकत नाही. समाजवादी देशाच्या बाहेरून आलेत का? तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही मतभेद गाडलेत. समाजवादी आमच्यासोबत आलीय. ते देशावर प्रेम करणारे आहेत. पाकिस्तानात जाऊन आम्ही प्रचार करत नाही. देशावर प्रेम करणारे लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेत. मग तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा टोलाही ठाकरेंनी भाजपाला लगावला.
 

Web Title: Shiv Sena alliance with Socialists; BJP targets Uddhav Thackeray with 'humorous' words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.