Join us

कांदिवलीच्या पावन धाम कोविड केअर सेंटरवरून शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये झाली खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवली पश्चिम महावीरनगर येथील पावन धाम जैन मंदिरातील पावन धाम कोविड केअर सेंटर वरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवली पश्चिम महावीरनगर येथील पावन धाम जैन मंदिरातील पावन धाम कोविड केअर सेंटर वरून आर / मध्य आर/उत्तर वॉर्डच्या मासिक बैठकीत शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शिवसेना व भाजप नगरसेविकांनी जोरदार आरडाओरडा केला.

आर/उत्तर आणि आर/मध्य प्रभाग समिती व्हर्च्युअल बैठकीत वॉर्ड क्रमांक १२ च्या शिवसेना नगरसेविका गीता सिंघण यांनी हरकतीचा मुद्दा उठवला.

पावन धाम कोविड सेंटर हे पालिकेने ताब्यात घेऊन मोफत चालविले पाहिजे. या हरकतीच्या मुद्द्याला शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांनी पाठिंबा दिला.

नगरसेविका गीता सिंघण यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सदर कोविड सेंटर हे विशिष्ट जातिधर्माच्या नागरिकांसाठी चालवले जात असून भाजप आपले नाव पुढे करत राजकारण करत आहे.

आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त संस्था असून गेले दीड वर्ष कोविड निर्मूलनासाठी अविरत कार्य करत आहे. येथे कोणीही राजकारण करू नये आणि नागरिकांना मोफत उपचार मिळाले पाहिजे.

यावेळी भाजप वॉर्ड ८ चे नगरसेवक हरीश छेडा आणि वॉर्ड २ चे नगरसेवक जगदीश ओझा यांनी या हरकतीच्या मुद्द्याला जोरदार विरोध केला. हरीश छेडा यांनी सांगितले की, रुग्णांना येथे वेळेवर चांगले उपचार मिळत असून उत्तम येथे उत्तम डॉक्टर व सुसज्ज वैद्यकीय सुविधा मिळत असून, नागरिक पैसे भरायला तयार आहेत. मात्र इथे द्वेष, ईर्ष्या भावनेचे राजकारण करून हरकतीचा मुद्दा उठवणे चुकीचे आहे.

नगरसेवक हरीश छेडा यांनी सांगितले की, महापालिका, तसेच फायर ब्रिगेडच्या सर्व परवानग्या आल्यानंतरच खासदार गोपाळ शेट्टी यांनी पावन धाम कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले होते. त्यामुळे आता वाद करणे अयोग्य आहे.

भाजप नगरसेवक जगदीश ओझा यांनी नगरसेविका गीता सिंघण यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. एका चांगल्या चालत असलेल्या आरोग्य उपक्रमाबद्दल दुर्दैवाने शिवसेना नगरसेविकांना पोटदुखी का होते, असा सवाल त्यांनी केला.

पावन धाम कोविड सेंटर बंद करणार

पावन धाम कोविड सेंटरचे विश्वस्त नीरव दोशी म्हणाले की, आजच्या पालिकेतील राजकारणाला आम्ही आता कंटाळलो असून पावन धाम कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी आणि आम्ही करोडो रुपये खर्च करून पावन धाम जैन मंदिराचे तीन मजले कोविड सेंटरला दिले. यामध्ये आम्ही कोणतेही जातिपातीचे राजकारण केले नाही आणि आम्ही सर्वांना अगदी नाममात्र दरात सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

-----------------------------