गोरेगावच्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडई भूमिपूजन प्रसंगी श्रेयवादावरून शिवसेना-भाजपा आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 09:45 PM2018-07-30T21:45:56+5:302018-07-30T21:46:13+5:30

गोरेगावमधील नागरिक ज्याची अनेक वर्षे प्रतीक्षा करत होते त्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज  शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

Shiv Sena and BJP on the occasion of Prabhakar Panshikar Natyagraha and Topiwala Mandai Bhumi Pujan in Goregaon | गोरेगावच्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडई भूमिपूजन प्रसंगी श्रेयवादावरून शिवसेना-भाजपा आमनेसामने

गोरेगावच्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडई भूमिपूजन प्रसंगी श्रेयवादावरून शिवसेना-भाजपा आमनेसामने

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई- गोरेगावमधील नागरिक ज्याची अनेक वर्षे प्रतीक्षा करत होते त्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज  शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्यावेळी शिवसेना आणि भाजपाचे  कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन श्रेय लाटण्यासाठी दाखल झाले होते. शिवसैनिकांची आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. यासंदर्भात लोकमतने आजच्या अंकात आणि काल ऑनलाइन लोकमतवर या भूमिपूजन सोहळ्यावरून सेना व भाजपात श्रेयवादावरून कलगीतुरा रंगणार हे दिलेले वृत्त आज खरे ठरले.

राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या गेल्या 25 वर्षांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर या भागात नाट्यगृह आणि मंडई उभी राहत आहे, असा  हा शिवसेनेचा दावा आहे. तर भाजपने आमच्या सरकारमुळे येथे नाट्यगृह व मंडई उभी राहत असलयाचा भाजपाचा दावा आहे.
या कार्यक्रमासाठी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. मात्र त्याचवेळी  भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली.  ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असो’, ‘जय शिवाजी जय भवानी’, अशा शिवसैनिकांनी  घोषणा दिल्या. पोलिसांनी देखील यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रम संपल्यानंतर देखील भाजपा कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते.

या भूमिपूजन सोहळ्यानंतर पी दक्षिण वॉर्डच्या सभागृहात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भाषणे झाली. यावेळी देखील सेना व भाजपाने एकमेकाला चिमटे काढले. या कार्यक्रमाला उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व शिक्षण मंत्री विनोद तावडे व भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांना या कार्यकमाचे  निमंत्रण दिले नाही, अशी खंत विद्या ठाकूर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली होती. त्यांच्या भाषणाचा धागा पकडून आपण भाजपा मुंबई अध्यक्ष झाल्यावर आम्ही आपणाला निश्चित कार्यक्रमाला बोलू, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी करताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

 तर गेल्या शनिवारी सकाळी विद्या ठाकूर यांच्या हस्ते गोरेगाव भाजपातर्फे प्रतीकात्मक उद्घाटन केले होते, यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी  आता तरी या नाट्यगृह व मंडईचे रितसर उदघाटन झाले ना असा टोला भाजपाला लगावला.येथील नाट्यगृह व मंडईसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गेली 25 वर्षे केलेले सातत्याने प्रयत्न तसेच या नाट्यगृहासाठी शिवसेनेचे विधिमंडळ मुख्यप्रतोद सुनील प्रभू हे येथे प्रभाग समिती अध्यक्ष आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी केलेले प्रयत्न आणि अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे नियोजित नाट्यगृहासाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना यशोधर(शैलेश)फणसे यांचा महापौरांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात गेली 25 वर्षे त्यांनी या नाट्यगृह व मंडईसाठी काय प्रयत्न केले याची माहिती दिली. या प्रकल्पात ८०० आसनांचे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नाट्यगृह, सुमारे २१० विक्री गाळ्यांसह मंडई आणि बहुमजली निवासी इमारतीत ५३ सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १२२ कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. आपल्या दमदार अभिनयाने मराठी रंगभूमी गाजवणारे आणि दर्जेदार नाट्यनिर्मिती करणारे दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेने याआधीच मंजूर केला आहे.
यावेळी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद व आमदार सुनील प्रभू, पी. दक्षिण विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव, पी. दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) व प्रभाग क्रमांक 54च्या शिवसेना नगरसेविका साधना माने, प्रभाग क्रमांक 50 चे भाजपा नगरसेवक दीपक ठाकूर, प्रभाग क्रमांक 51 चे शिवसेना नगरसेवक स्वप्नील टेंम्बवलोकर, प्रभाग क्रमांक 52च्या भाजपा नगरसेविका प्रीती सातम, प्रभाग क्रमांक 53 च्या शिवसेना नगरसेविका रेखा रामवंशी, प्रभाग क्रमांक 55चे भाजपा नगरसेवक हर्ष पटेल, प्रभाग क्रमांक 56 च्या भाजपा नगरसेविका राजुल देसाई, प्रभाग क्रमांक 57 च्या भाजपा नगरसेविका श्रीकला पिल्ले, माजी उपमहापौर दिलीप पटेल, माजी नगरसेवक दिलीप शिंदे व माजी नगरसेविका प्रमिला शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena and BJP on the occasion of Prabhakar Panshikar Natyagraha and Topiwala Mandai Bhumi Pujan in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.