Maharashtra Political Crisis: “४० आमदार म्हणजे पक्ष नाही, ‘धनुष्यबाण’ आमच्याकडेच राहणार”; शिवसेनेने पुन्हा शिंदे गटाला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 02:13 PM2022-07-11T14:13:32+5:302022-07-11T14:14:07+5:30
Maharashtra Political Crisis: काही आमदार आणि खासदार म्हणजे शिवसेना पक्ष नाही. शिवसेना ३६ लाख कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, या शब्दांत शिवसेनेने पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका केली.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेला गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करत शिंदे गटाकडून निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला असून, ४० आमदार म्हणजे पक्ष होत नाही, अशी टीका केली आहे.
शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाकडेही जाणार नाही. याबाबतची लढाई आता निवडणूक आयोगाकडे होईल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विधीमंडळ सचिवालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानुसार, नवीन अध्यक्षांची निवड झाली आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय ते घेतील. त्यामुळे याचिका निकाली काढावी असे म्हटले होते. सध्याचे विधानसभा अध्यक्ष भाजपचे आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची शक्यता धुसर आहे, असा दावा अनिल परब यांनी केला आहे.
आता लढाई निवडणूक आयोगासमोर
शिवसेनेने निवडणूक आयोगासमोरील लढाईची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतची आता पुढील लढाई निवडणूक आयोगाकडे असणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह जाणार नाही. ४० आमदार आणि काही खासदार म्हणजे शिवसेना पक्ष नाही. शिवसेना हा ३६ लाख कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. निवडणूक आयोगासमोर जाऊ तेव्हा आमच्याकडे किती कार्यकर्ते आहेत, याचीही संख्या दिली जाणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीच्या पद्धतीने झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदांच्या निवडणुकीत ३९ आमदारांनी व्हिपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. विधिमंडळाच्या प्रतिज्ञापत्रानुसार आता कारवाई होणार नाही, अशी शक्यता आहे. शिवसेनेने सर्वोच्च चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्यपालांनी शिंदे गटाला कोणत्या अधिकारांतर्गत शपथ देण्यात आली, असा सवाल करत या याचिकांचा निकाल आमच्या बाजूने लागल्यास बहुमत चाचणी रद्द होईल, असा दावा अनिल परब यांनी केला.