Maharashtra Politics: “मूठभरांसाठी काम करणारे जावो, जनतेचे राज्य येवो”; प्रजासत्ताक दिनी शिवसेनेचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 08:33 AM2023-01-26T08:33:20+5:302023-01-26T08:34:43+5:30

Maharashtra News: जनतेचे जगण्या-मरण्याचे असंख्य प्रश्न आहेत, त्याची उत्तरे मिळणार का? देशात घटनेप्रमाणे एखादे तरी काम सुरू आहे का? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

shiv sena asked many questions to bjp modi govt on india republic day 2023 | Maharashtra Politics: “मूठभरांसाठी काम करणारे जावो, जनतेचे राज्य येवो”; प्रजासत्ताक दिनी शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Maharashtra Politics: “मूठभरांसाठी काम करणारे जावो, जनतेचे राज्य येवो”; प्रजासत्ताक दिनी शिवसेनेचा भाजपवर निशाणा

googlenewsNext

Maharashtra Politics: देशाचा प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा होत आहे. पण ज्या कारणासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, त्या सामान्य प्रजेला, शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतमजुरांना, कामगार-कष्टकऱ्यांना, बेरोजगार तरुणांना ही प्रजेची सत्ता आहे, असे खरोखरच वाटते आहे काय? प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा आनंद गाव, खेडी, तांडे, वस्त्यांवरील गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर दिसतो आहे का? असा सवाल करत, मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो, हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल!, अशी टीका शिवसेनेने भाजप आणि मोदी सरकारवर केली आहे. 

निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल, असे आवाहन शिवसेनेने सामना अग्रलेखातून केले आहे. ज्या जनतेचे हे प्रजासत्ताक आहे, त्या सर्वसामान्य जनतेचे जगण्या-मरण्याचे जे असंख्य प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे त्यातून मिळणार आहेत का? असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. 

देशात खरोखरच प्रजेची सत्ता अस्तित्वात आहे का?

आपल्या देशात खरोखरच प्रजेची सत्ता अस्तित्वात आहे, असे कसे म्हणता येईल? हरित क्रांती आली, औद्योगिक क्रांती आली, वैज्ञानिक क्रांतीचे लाभ आणि आधुनिकीकरण असे चांगले बदल निश्चितच झाले. तथापि, या बदलांचा मोठा लाभ कुणाला झाला? केवळ मुंबई, दिल्ली, बंगलोर, कोलकाता येथील उंच टॉवर आणि चमकधमक म्हणजेच काही हिंदुस्थान नव्हे! या महानगरांच्या पलीकडे जो खंडप्राय देश पसरला आहे, तेथील जनतेचे काय? देशातील श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब आणखी गरीब! ही विषमतेची व्यवस्था म्हणजे प्रजासत्ताक देश म्हणावे काय? असे अनेक प्रश्न शिवसेनेने अग्रलेखात उपस्थित केले आहेत. 

दरम्यान, देशातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीवर प्रकाश टाकताना हा अहवाल म्हणतो की, हिंदुस्थानातील केवळ २१ धनाढ्य अब्जाधीशांकडे सध्या देशातील ७० कोटी लोकांपेक्षा अधिक संपत्ती आहे. एकीकडे हिंदुस्थानातील तरुण वर्ग बेरोजगारीने ग्रासलेला आहे. नोकऱ्यांसाठी वणवण भटकतो आहे, शेतीचा खर्च आणि शेतमालाचा भाव यांचा कुठेच मेळ बसत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि दुसरीकडे अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये मात्र दररोज साडेतीन हजार कोटी रुपयांची वाढ होत आहे. देशात घटनेप्रमाणे एखादे तरी काम सुरू आहे काय? सगळीकडे ताटाखालचीच मांजरे हवीत आणि सरकारी हुकमांना ‘होयबा’ म्हणणारे लोक हवेत, अशी हुकूमशाही मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हाती आज देशाचे प्रजासत्ताक सापडले आहे, या शब्दांत शिवसेनेने हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena asked many questions to bjp modi govt on india republic day 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.