नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीमधील अपयशानंतर शिवसेनेमधील अंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. संघटनावाढीपेक्षा एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झाले असून त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच पक्ष बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये ४५ हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. या यशामुळे विधानसभा व नंतर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होणार असे वातावरण निर्माण करण्यात आले. परंतु नंतरच्या काळात पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहिला नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये ऐरोली व बेलापूरच्या उमेदवारांनी स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबविली. संयुक्तपणे जाहीरनामाही सादर केला नाही. यामुळे विजयाची खात्री असताना प्रत्यक्षात मात्र दोन्ही मतदार संघात अपयश पदरात पडले. तेव्हापासून संघटनेमधील मतभेद मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. उपनेते विजय नाहटा व जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी विभागनिहाय बैठका सुरू केल्या परंतु या बैठकांमध्येही नेरूळ व इतर ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणे झाली. वाढत्या भांडणामुळे बैठकाच थांबवाव्या लागल्या आहेत. कार्यक्रमासाठी सर्व नेते एकाच व्यासपीठावर येवू लागले तरी कार्यक्रम संपला की एकमेकांविरोधात बोलण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. निवडणुकांची तयारी सुरू असतानाच जिल्हा प्रमुखांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला व मतभेदांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्हा प्रमुख विरोधी गटांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत तक्रारी केल्या. काहींनी सह्णांची मोहीम राबवून पत्र दिल्याचीही चर्चा सुरू झाली. जिल्हा प्रमुखांनी राजीनामा देण्यासाठी दबावतंत्र सुरू झाले. जिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हा प्रमुख होण्यासाठी इच्छूकांची मोर्चेबांधणी सुरू झाली. काँगे्रस व इतर पक्षातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिवसेनेमध्ये येण्यास उत्सुक आहेत. परंतु पक्षातील भांडणे पाहून अनेकांनी थांबा व पहा ही भूमिका घेतली आहे. महापालिकेवर भगवा फडकण्याची स्वप्ने पाहिली जात असताना दुसरीकडे मात्र आहेत त्या जागा तरी टिकणार का अशी प्रतिक्रिया काही पदाधिकारी व्यक्त करत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीपूर्वीच शिवसेना बॅकफूटवर
By admin | Published: January 13, 2015 1:02 AM