शिवसेनेच्या अंगणातील लढाई चर्चेत; धारावीच्या पुनर्विकासावरून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 08:32 AM2024-05-18T08:32:21+5:302024-05-18T08:34:42+5:30
शिवसेनेच्या अंगणात होत असलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी तसेच दादर, माहिम, प्रभादेवी, माटुंग्याचा उच्चभ्रू भाग आणि चेंबूरसारखा औद्योगिक वसाहतींचा परिसर लाभलेल्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील निवडणूक यंदा रंगतदार होणार आहे. दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या असून, शिवसेनेच्या अंगणात होत असलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. इंडिया आघाडीने या मुद्द्यावरून रान पेटविले आहे. तसेच धारावीकरांना मिठागराच्या जमिनीवर पाठविण्याला विरोध दर्शवीत आंदोलने केली आहेत. उद्धवसेनेकडून धारावीमध्ये प्रचारात हाच मुद्दा प्रामुख्याने मांडला जात आहे. त्यातून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे काहीसे बॅकफूटवर गेले असून, धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन आता सत्ताधाऱ्यांकडून दिले जात आहे.
दोन्ही पक्षांनी या मतदारसंघात सर्वात आधी उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली होती. राहुल शेवाळे यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे शेवाळे यांना मतदारसंघाबाबत माहिती आहे. तसेच मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आहे. त्याच वेळी उद्धवसेनेकडून नवख्या अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देसाई हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यातून देसाई हे पांढरपेशा वर्गातील असल्याने ते सर्वसामान्यांचे प्रश्न जाणतील का? असा प्रचार विरोधी गटाकडून केला जात आहे. याला उद्धवसेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
मराठी मतांचे विभाजन
या मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाची मोठी मते आहेत. तसेच काँग्रेसचाही मतदार वर्ग आहे. अनिल देसाई यांच्याविरोधात राहुल शेवाळे उमेदवार असल्याने मराठी मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देसाई यांची भिस्त काँग्रेसच्या मतदारांवर राहणार असून, त्यांना काँग्रेसची अधिकाधिक मते वळवावी लागणार आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
धारावी पुनर्विकास प्रकल्प. यात रहिवाशांचे धारावीत की धारावीबाहेर स्थलांतरण केले जाणार? यावरून रान पेटले आहे. चेंबूर, माहुल परिसरातील वाढते प्रदूषण, झोपडपट्टी भागाचा रखडलेला पुनर्विकास
२०१९ मध्ये काय घडले ?
उमेदवार पक्ष प्राप्त मते
राहुल शेवाळे शिवसेना ४,२४,९१३
एकनाथ गायकवाड काँग्रेस २,७२,७७४
संजय भोसले वंचित ६३,४१२
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के
२०१४ राहुल शेवाळे शिवसेना ३,८१,००८ ४९.६
२००९ एकनाथ गायकवाड काँग्रेस २,५७,५२३ ४३
२००४ मोहन रावले शिवसेना १,२८,५३६ ३६.९
१९९९ मोहन रावले शिवसेना १,७६,३२३ ४७.९