Join us  

उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागतंय; यासरखं दुर्दैव नाही- गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 4:20 PM

आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर आता शिंदे गटातील माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई- शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आता शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. या शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे रोज बंडखोरांवर निशाणा साधत आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, गद्दारी का केली हे कळलेच नाही. हे सरकार थोड्याच दिवसात कोसळणार, हे गद्दारांचे सरकार असून नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याचा हल्लाबोल आदित्य यांनी आपल्या भाषणातून केला. तसेच, गद्दारांनी शिवसैनिकांचा आवाज ऐकावा, जो आवाज मतदानाच्या पेटीतून दिसून येईल, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर आता शिंदे गटातील माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. त्यांनी तरी राज्याचे दौरे करायला हवे होते, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

सत्ता गेल्यानंतर ते संपूर्ण राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहेत. आदित्य यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे, यासारखं दुसरे दुर्दैव आज नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

भिवंडीतूनही एल्गार, सरकार कोसळणार- आदित्य ठाकरे

मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? असे म्हणत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून बंडखोरांवर हल्लाबोल केला. यावेळी, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे भाकीतही त्यांनी केलं होतं.

टॅग्स :आदित्य ठाकरेगुलाबराव पाटीलशिवसेनाउद्धव ठाकरे