मुंबई: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीवर (Motoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले. त्यावरून शिवसैनिक संतप्त झाले आहेत. यानंतर लगेचच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर जमण्यास सुरुवात केली. मातोश्रीबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. यातच आता हिंमत असेल तर येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहेत, असे बॅनर मातोश्रीसमोर झळकले असून, शिवसेनेने शक्तिप्रदर्शनास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
"हिम्मत असेल तर वांद्रे (पूर्व) येथे येऊन दाखवा. शिवसैनिक सज्ज आहेत." , अशा आशयाचे पोस्टर मातोश्री लगतच्या परिसरात झळकल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिक संदिप शिवलकर आणि डॉ. विवेकानंद जाजू अशा कार्यकर्त्यांची नावे या बॅनरवर असल्याचे दिसत आहे. तत्पूर्वी, सकाळपासूनच रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी शिवसैनिक जमा झाले असून, ती गर्दी वाढत चालल्याचे दिसत आहे. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे. तरी राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
तेजस ठाकरेंनी घेतली शिवसैनिकांची भेट
राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांची भेट घेतली. यानंतर रात्रभर शिवसैनिकांचा मातोश्रीवरील ओघ सुरूच होता. मध्यरात्रीपासूनच शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर गर्दी जमा झाल्याचे सांगितले जात आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांची कार मातोश्री बाहेरून जात असताना शिवसैनिकांनी त्यावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कंबोज यांनी शिवसेनेचे दावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळे रात्री मातोश्रीबाहेर तणाव निर्माण झाला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी मध्यरात्री मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. यावेळी जेवणाची आणि पाण्याची तेजस ठाकरे यांनी विचारपूस केल्याची माहिती देण्यात आली आहे.