मुंबई : महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर मुंबई काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. महापालिकेची वाॅर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडत अन्यायकारक आहे. विशिष्ट लोकांना खूश करण्यासाठी आणि शिवसेनेला फायदा होईल, अशा पद्धतीने पालिकेने ही प्रक्रिया पार पाडली. काँग्रेसच्या हरकती आणि सूचनांचा विचार करण्यात आला नाही. या प्रकाराविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबई महापालिकेची वाॅर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडत, यासंदर्भात काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगताप यांच्यासह कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा आदी उपस्थित होते. यावेळी जगताप म्हणाले की, पालिका आरक्षण सोडतीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झालेले नाही. काँग्रेसला अधिक त्रास होईल, अशा पद्धतीनेच ही आरक्षण सोडत निघाल्याचे सांगून भाई जगताप म्हणाले की, दक्षिण मुंबईतील ३०पैकी २१ वाॅर्ड महिलांसाठी आरक्षित करण्यात आले.
कुर्ला भागातही आरक्षण टाकण्यात आले. काँग्रेसच्या २९पैकी २१ नगरसेवकांच्या वॉर्डात महिला आरक्षण पडले आहे, तर लॉटरीसुद्धा २३ जागांसाठीच काढली गेली. अनुसूचित जाती - जमातींसाठी राखीव जागांसाठी लोकसंख्येचे प्रमाण पाहिले जाते. पण, यंदा तसे झाल्याचे दिसत नाही. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि शिवसेनेची ही मिलीभगत आहे. ६ जूनपर्यंत आम्ही आमच्या हरकती, सूचना व आक्षेप मांडणार आहोत. त्या मान्य झाल्या नाहीत, तर मुंबई काँग्रेस न्यायालयात जाणार आहे, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.
रवी राजा म्हणाले की, वॉर्ड पुनर्रचना केल्यावर आरक्षण सोडत प्रक्रियासुद्धा नव्याने करायला पाहिजे असा नियम आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनी तसे न करता ५३ प्रभाग घोषित करून टाकले. शिवसेना व भाजपचे जास्त नगरसेवक असूनसुद्धा त्यांच्या जागांवर फार कमी प्रमाणात महिला वॉर्डचे आरक्षण झाले. इक्बालसिंह चहल कुणाची सुपारी घेऊन काम करत आहेत का, असा सवालही रवी राजा यांनी उपस्थित केला.
राजस्थानातील उदयपूर येथे काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर झाले होते. या शिबिरातील संदेश, विचार विभागीय पातळीवर पोहोचविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ आणि ६ जूनला पनवेल येथे मुंबई काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती भाई जगताप यांनी दिली.