"हा नियतीचा खेळ! अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेनं राज ठाकरेंना दगा दिला"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 11:55 AM2022-07-26T11:55:09+5:302022-07-26T11:55:33+5:30
जे कपट कारस्थान तुम्ही इतरांसोबत केले तेच आज तुमच्यासोबत घडत आहे असा टोला मनसेने उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे.
मुंबई - अडीच वर्ष संपत्ती कमवली आणि आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतून होत आहे. कर्माची फळे इथेच भोगायची असतात. नियती तिचं चक्र पूर्ण करत असते. जी गोष्ट तुम्ही लोकांसोबत केलं तेच आज तुमच्यावर वेळ आली आहे. अमित ठाकरे मोठ्या आजारपणाशी लढत असताना राज ठाकरे व्यस्त होते. तेव्हा शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडण्याचं पाप केले आज तेच तुमचे आमदार फुटून होत आहे असा टोला मनसेनेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे.
मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की, जे कर्म असते त्याची फळे इथेच भोगायची असतात. ते तुम्ही भोगत आहात. मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा सर्जिकल स्ट्राईक म्हणून शिवसेना नेते बोंबलत होते. बाळासाहेबांचं नाव वापरू नये म्हणता जेव्हा स्मारकासाठी जागा मागितली तेव्हा बाळासाहेब ठाकरे सर्वांचे होते आता एकट्याचे कसे झाले? मुळात बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. ते महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्यावर कुणाचा मालकी हक्क नाही. सोयीनुसार अर्थ बदलणार का? असा सवाल त्यांनी केला.
तसेच आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरं अशी आजची मुलाखत होती. हाच पालापाचोळा तुमच्यासोबत अडीच वर्ष घट्ट होता. जे कपट कारस्थान तुम्ही इतरांसोबत केले तेच आज तुमच्यासोबत घडत आहे. बेस्ट सीएमचा सर्व्हे केवळ उद्धव ठाकरेंपुरता केला होता का? तुम्ही घरात बसला म्हणून महाराष्ट्राची वाट लागली. त्याचं कौतुक कसलं करता? असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
मोदी तुमचे वडील होते का - भाजपा
विरोधी पक्ष हा संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा असं म्हणता. इतरांना गद्दार बोलता. मुलाखतीत म्हणता माझ्या वडिलांचे फोटो लावून मत मागितले. मग २०१९ मध्ये निवडणुकीत बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही फोटो होते. मोदी तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही फोटो का लावता? सूडाचं राजकारण नको म्हणता मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंना अजामीन पत्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार नाही असं म्हटलं तरी १४ दिवस जेलमध्ये टाकलं अशा शब्दात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीकास्त्र सोडलं आहे.