-संजीव साबडे
शिवसेना स्थापन झाली तेव्हा ती मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी चळवळ होती, संघटना होती. तिची जून १९६६ मध्ये शिवाजी पार्कवर स्थापना झाली, तेव्हा व्यासपीठावर दिवंगत रामराव आदिक होते, ज्यांना सारे जण काँग्रेसचे नेते म्हणूनच ओळखतात. समाजवादी, कम्युनिस्ट असे अनेक पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या मेळाव्याला गेले होते. तिथे यापैकी अनेकांनी शिवसेना सदस्यत्वाचा फॉर्म भरून दिला होता. संयुक्त महाराष्ट्र झाला असला, तरी राजधानी मुंबईत अमराठींचा वरचष्मा होता. मराठी माणसासाठीच्या शिवसेनेचे सर्वांनाच आकर्षण होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करील, असे म्हटले होते.
शिवसेनेकडे स्वतःचे कार्यालय नव्हते, बाळासाहेबांच्या घरातूनच संघटनेचे काम चाले. ती जागा अपुरी वाटल्याने दादरच्या सेनापती बापट मार्गावरील पर्ल सेंटरमध्ये दोन खोल्या भाड्याने घेतल्या. स्वतः बाळासाहेब नियमितपणे तिथे येऊन बसत. हळूहळू संघटनेचा व्याप वाढू लागला, सर्वत्र शाखा सुरू होऊ लागल्या, तसतशी पर्ल सेंटरमधील जागाही कमी पडू लागली. शिवसेनेचे स्वतःचे मोठे कार्यालय असावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. कार्यालय मध्यवर्ती भागातच म्हणजे दादरला हवे होते. त्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. तशी जागा उमरभाई नावाच्या व्यक्तीकडे होती. अगदी शिवाजी पार्कच्या समोरील बाजूस. तेव्हा मुंबईतील जागांच्या किमती गगनाला भिडल्या नव्हत्या. त्यामुळे ती जागा विकत घेण्यात आली. जागा मिळाली; पण बांधकामासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न होता; पण बाळासाहेबांनी आवाहन करताच शिवसैनिकांनी पुढाकार घेतला. वर्गण्या, लहान मोठ्या देणग्या, सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही निधी उभा राहिला. मग शिवाई ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यासाठी सुधीर जोशी, मनोहर जोशी आदींनी पुढाकार घेतला.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर आठ वर्षांनी शिवसेना भवन उभे राहू लागले. पूर्ण बांधकाम झाल्यावर १९७७ साली त्याचे उद्घाटन झाले. त्यात एक अंबामातेचे मंदिर व शिवरायांचा मोठा पुतळाही आला. पुढे १२ मार्च १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यापैकी एक सेना भवनापाशी. थोडे नुकसान झाले त्यात. त्यामुळे किरकोळ दुरुस्ती वा डागडुजीऐवजी नवे सेना भवन बांधण्याचा निर्णय झाला. आर्किटेक्ट म्हणून शशी प्रभू यांनी काम पाहिले आणि २७ जुलै २००४ ला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी नवे आणखी मोठे सध्याचे शिवसेना भवन उभे राहिले. कोणत्याही राजकीय पक्षाचे मुंबईतील सर्वांत मोठे कार्यालय म्हणून शिवसेना भवन ही कायमस्वरूपी मुंबईची ओळख बनली.
सेना भवनाची मालकी शिवाई ट्रस्टकडेच
शिवसेना भवनची मालकी कोणाकडे जाणार, याची सध्या चर्चा होत राहते. या वास्तूची मालकी शिवाई ट्रस्टकडे आहे आणि ट्रस्टवर उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे पक्षातील पडझडीनंतरही शिवसेना भवन उद्धव ठाकरे गटाकडे राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. असे सांगून त्यावर आम्ही दावा करणार नाही, असे सूचित केले आहे.
आणखी एक शिवसेना भवन
एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनीही सेना भवनावर हक्क सांगणार नाही. असे म्हटले आहे; पण त्यांना मुंबईत त्याच तोडीचे शिवसेना भवन उभारायचे आहे, तेही दादरमध्ये, स्टेशनजवळच, त्यासाठी जागेचा शोध सुरु आहे. यशवंत नाट्य मंदिर, दादर- माटुंगा कल्चरल सेंटर व रूपारेल कॉलेज परिसरात कदाचित नवे सेना भवन उभे राहू शकेल.