मुंबई : शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करत असल्याचे सांगितले होते. परंतु गेल्या काही दिवसांतील राज्यातील घडामोडी पाहिल्यास त्यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद झाला. त्यांची युती केवळ खुर्चीसाठी होती, अशी टीका कम्युनिस्ट पार्टीने (मा-ले) पत्रकार परिषदेत केली. या वेळी कम्युनिस्ट पार्टी (मा-ले)चे महासचिव के. एन. रामचंद्रन, महाराष्ट्र सचिव प्रवीण नाडकर, केंद्रीय समिती सदस्य कॉ. संजय सिंघवी उपस्थित होते.या वेळी प्रवीण नाडकर म्हणाले, राज्यात रोजगार, शेती आदी प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण भाजप आणि शिवसेनेच्या भांडणामुळे सत्तेचा तिढा निर्माण झाला. त्यांना राज्यातील इतर प्रश्नांपेक्षा मुख्यमंत्री पदातच जास्त रस आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जायचे; पण दलितांवर अन्याय होत आहेत, कामगारांचे शोषण होते, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरातने ठरविणे चुकीचे आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यातील नेत्यांनीच ठरविला पाहिजे. नुकताच अयोध्या खटल्याचा निकाल लागला. राम मंदिरासाठी जमीन मिळणार आहे. पण मंदिराशिवाय हिंदूंचे इतरही प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, भाकपा महाराष्ट्र (मा-ले) आणि भाकपा (मा-ले) रेडस्टार हे दोन एकत्र आले असून इतरही कम्युनिस्ट गटांनी एकत्र यावे, असे आवाहन नाडकर यांनी केले.
शिवसेना, भाजपची युती केवळ खुर्चीसाठी कम्युनिस्ट पार्टीची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 5:07 AM