मुंबईः गेली साडेतीन-चार वर्षं भाजपाशी कडाडून भांडणाऱ्या, सत्ता सोडण्याचे इशारे देणाऱ्या आणि 'स्वबळा'ची घोषणा करणाऱ्या शिवसेनेनं आज आपल्या 'जुन्या मित्रा'ला 'टाळी' देऊन सगळ्यांनाच धक्का दिला आहे. याच महिन्यात होणारी विधानपरिषद निवडणूक भाजपा आणि शिवसेना एकत्र लढवणार आहेत. त्यांच्यात ५०-५० फॉर्म्युला निश्चित झालाय. त्यांचं हे 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' स्वरूपाचं नातं पाहून, २०१९ मध्येही त्यांची युती होणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य विधानपरिषदेतून मे आणि जून अखेर निवृत्त होत असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ३१ मे २०१८ रोजी संपतेय. राष्ट्रवादीचे जयंत जाधव (नाशिक) आणि बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड) आणि भाजपाचे प्रवीण पोटे (अमरावती), मितेश भांगडिया (चंद्रपूर) या सदस्यांची मुदत २१ जून रोजी मुदत संपत आहे. त्यांच्या जागी नवे सहा प्रतिनिधी विधानसभेवर जाणार आहेत.
या निवडणुकीसाठी तीन जागांवर शिवसेनेनं उमेदवारांची घोषणा केलीय, तर तीन जागा भाजपा लढवणार आहे. नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेनं उमेदवार दिलेत. अमरावतीतून भाजपाच्या प्रवीण पोटेंनी पुन्हा अर्ज दाखल केलाय, तर दोन जाागांवरील उमेदवार आज निश्चित होतील. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे.
विधानपरिषदेच्या या निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र आल्यास सत्ताधारी पक्षासाठी चांगले निकाल येऊ शकतात, असं समीकरण राजकीय विश्लेषकांनी मांडलं होतं. पण, शिवसेना-भाजपातील तणाव पाहता, त्यांची युती होणार का, याबद्दल शंकाच होती. पण, झालं गेलं विसरून, मोठ्या 'लॉटरी'च्या आशेनं भाजपा-शिवसेनेनं हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढलीय.