मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन महाराष्ट्रला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं भूमीपूजन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. युतीचंच सरकार येणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच सत्तेचा हव्यास नाही. विकास करण्यासाठी सत्ता हवी असं उद्धव यांनी म्हटलं आहे.
'मोदीजी, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधाल हा विश्वास, समान नागरी कायदा देखील तुम्ही आणाल हा विश्वास. 370 रद्द झालं; याचा अभिमान आहे. काश्मीर हा आपला अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. मोदी यांच्या रूपाने नेता सापडला आहे. मुंबईला सुविधा देत आहात याचा आनंद आहे. राज्यात युतीचे सरकार येणार. सत्तेचा हव्यास नाही. विकास करण्यासाठी सत्ता हवी' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी 'आज मला अभिमान आहे, इथेच पलीकडे आपली प्रचाराची विराट सभा झाली होती. आणि त्या सभेत आपण ठणकावून सांगितले होते की आमचं सरकार येणार म्हणजे येणारच आणि ते आलंच' असं म्हटलं आहे. तसेच शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारा पंतप्रधान जगानं मोदींच्या रुपात पाहिला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मेट्रोमुळे प्रवास वेगवान होणार, वेळ वाचवणार. इंटिग्रिटेड तिकीट सिस्टिमवर चालणारं मुंबई देशातलं पहिलं शहर असेल. मेट्रो प्रकल्पांतील मानवी, तांत्रिक चुकींचं प्रमाण अत्यल्प असेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे 42 किलोमीटरने वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-11 वरील 12.7 किलोमीटरचा मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-12 वरील 20.7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे.
पंतप्रधान यांनी अद्ययावत मेट्रो भवनचे भूमीपूजनही केले. ही 32 मजली इमारत असून 340 किलोमीटर अंतराच्या 14 मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल. पंतप्रधान यांनी कांदिवली पूर्व इथल्या बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचे उद्घाटन त्यांनी केले. महामुंबई मेट्रोसाठी ब्रॅण्ड व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन पंतप्रधान यांनी केले.