Join us

मुंबईत शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष; चेंबूर पोलीस स्टेशनबाहेर जोरदार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:43 PM

भाजपाच्या रथाची तोडफोड करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी चेंबूर पोलीस स्टेशनबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने मुंबईत पोलखोल अभियान सुरूवात केली आहे. परंतु मागील काही दिवसांत भाजपाच्या पोलखोल अभियानात रथाची तोडफोड, स्टेज काढून टाकणे अशा घटना घडल्या आहेत. चेंबूरमध्ये भाजपाच्या रथावर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती. यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप भाजपाने केला होता. हल्लेखोरांना अटक करावी यासाठी भाजपाचे नेते विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईत पोलखोल अभियानातंर्गत मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना जाणुनबुजून भाजपाच्या पोलखोल अभियानात बाधा आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपींना अटक करावी यासाठी भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी पोलिसांशी चर्चा करत आहे. भाजपाच्या रथाची तोडफोड करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी चेंबूर पोलीस स्टेशनबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने तोडफोड केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये  रेकॉर्ड झाले आहे. रात्री १ नंतर हे कृत्य झालं आहे. राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नाही असा आरोप भाजपाने केला आहे.

शिवसेना अस्वस्थ, पोलखोल होणारच

भाजपाच्या रथावर तोडफोड केली जाते त्यात कुणाला अटक करण्यात येत नाही त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला निशाणा साधला आहे. पोलखोल आम्ही रोज करतोय, ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे हल्ले सुरू आहेत. त्यांनी किती हल्लेही केले तरी पोलखोल होणार आहे असा इशारा फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.

शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र

काहीही झालं तरी शिवसेनेवर नाव घ्यायची भाजपाला सवय आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहे. चुकीच्या गोष्टीला पोलीस अभय देणार नाही. मुंबईचे पोलीस हल्लेखोरांना पकडण्यास सक्षम आहेत. भाजपाने आरोप करायचे ते करत राहू दे. शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र भाजपाचं आहे. पोलखोल करण्यासाठी नियमांचे पालन करणं गरजेचे आहे. कुठेही स्टेज बांधायचे हे चालत नाही. लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. परंतु कायद्याचे पालन न करता मुंबईत अस्थिर वातावरण करायचं, महागाईबद्दल बोलायचं नाही. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलायचं नाही. केवळ मुंबई महापालिकेवर लक्ष्य ठेवून ती मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जायचं हे काम भाजपा करतंय असा आरोप महापौर किशोर पेडणेकर यांनी केला आहे.   

टॅग्स :शिवसेनाभाजपा