कथित धमकी प्रकरणावरून शिवसेना भाजप आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 02:04 AM2020-12-06T02:04:39+5:302020-12-06T02:05:56+5:30
Mumbai news : यशवंत जाधव यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे पडसाद शुक्रवारी उमटले.
मुंबई : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला धमकी दिल्याच्या कथित प्रकरणावरून शुक्रवारी भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आले. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याबाबत परवानगी मिळाली नाही. परिणामी, भाजप सदस्यांनी शुक्रवारी अध्यक्षांच्या दालनाबाहेर आंदोलन केले. नेमके याचवेळी शिवसेना सदस्यदेखील येथे आल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक संघर्ष होत होता.
यशवंत जाधव यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे बैठकीत हरकतीचा मुद्दा मांडणार होते. मात्र मुद्दा मांडू दिला नाही. त्यामुळे भाजप सदस्यांनी जाधव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. शिवसेना सदस्यही येथे आल्याने अधिक काळ राजकीय नाट्य रंगले होते. दरम्यान, सभागृह नेत्यांनी मध्यस्थी केली. आपण या मुद्द्यावर नंतर चर्चा करू. मात्र आता हे आंदोनल थांबवा, असे म्हणणे भाजप सदस्यांकडे मांडण्यात आले. त्यानंतर कुठे हे आंदोनल स्थगित करण्यात आले. दरम्यान, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये धमकी नाही. नगरसेवकाने कंत्राटदाराला कामाबाबत विचारल्यास ते नवे नाही, असे सपा आणि विरोधी पक्ष नेत्याचे म्हणणे आहे. भाजपने मात्र या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असल्याचे म्हणणे मांडले.