उद्यानाच्या नामकरणावरून शिवसेना-भाजप आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:11+5:302021-07-16T04:06:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोवंडी येथील उद्यानाचे नामकरण टिपू सुलतान उद्यान करण्याचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोवंडी येथील उद्यानाचे नामकरण टिपू सुलतान उद्यान करण्याचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. परंतु, या नामकरणास आक्षेप घेत भाजपने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. तरीही समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारार्थ पाठवला. यामुळे संतप्त भाजप सदस्यांनी गुरुवारी सभात्याग करीत अध्यक्षांना घेराव घालून निदर्शने केली. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेही दाद मागितली.
समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी पत्राद्वारे ही मागणी केली होती. यावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला. मात्र या नामकरणास भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रस्ताव गुरुवारी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत आला असता, या उद्यानाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने हा विषय आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठवावा, असे आदेश अध्यक्षांनी दिले. यावर उपसूचना मांडण्यासाठी वारंवार मागणी करूनही संधी न मिळाल्याने संतप्त भाजप सदस्यांनी निषेध करीत सभात्याग केला. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घातला व त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्या वेळी अध्यक्षांनी सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे भाजप सदस्यांनी महापौरांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली. या नामकरणास आपला विरोध असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप सदस्यांनी दिला आहे.
यामुळे विरोध
टिपू सुलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, जुलमी, अत्याचारी व हिंदूद्वेष्टा राजा होता. या उद्यानाला मौलाना आझाद, महामहीम अब्दुल कलाम, हविलदार अब्दुल हमीद अशा भारतमातेच्या थोर सुपुत्रांची नावे देण्यास आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
शिवसेनेचा बचावात्मक पवित्रा
या उद्यानाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव समजून घेण्याकरिता फेरविचारासाठी प्रशासनाकडे पाठवला आहे. मात्र याचे राजकारण करू नये. हा समितीच्या काजकाज प्रणालीचा भाग असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. तर या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देऊच, असे समाजवादी पक्षाने सांगितले आहे. याविषयी प्रशासकीय नियमांची पडताळणी करून लक्ष घालते, असे आश्वासन महापौरांनी दिले आहे.