मुंबई मनपात शिवसेना-भाजप नगरसेवक पुन्हा आमने-सामने 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:55 PM2022-01-21T19:55:40+5:302022-01-21T19:56:25+5:30

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी सुरु केली आहे. यामुळे उभय पक्षांमध्ये संघर्ष वाढू लागला आहे.

Shiv Sena BJP corporators clash again in Mumbai corporation | मुंबई मनपात शिवसेना-भाजप नगरसेवक पुन्हा आमने-सामने 

मुंबई मनपात शिवसेना-भाजप नगरसेवक पुन्हा आमने-सामने 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी सुरु केली आहे. यामुळे उभय पक्षांमध्ये संघर्ष वाढू लागला आहे. शुक्रवारी स्थायी समितीच्या ऑनलाईन बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बोलू न दिल्याने भाजपच्या सदस्यांनी त्यांच्या दालनाबाहेरच निदर्शने करीत धरणे आंदोलन सुरु केले. यावेळी शिवसेना स्थायी समिती सदस्य देखील भाजपच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केल्यामुळे तणाव वाढला. अखेर अध्यक्षांनी हस्तक्षेप केल्यानंतर शिवसेना सदस्यांनी माघार घेतली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत भाजप सदस्य तळ ठोकून होते. 

कोविडचा प्रसार वाढत गेल्याने स्थायी समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन बैठकीत आपले प्रश्न मांडण्यात अडचणीत येतात, असा आक्षेप भाजपने यापूर्वी अनेकवेळा घेतला. शुक्रवारी स्थायी समितीच्या पटलावर अनेक महत्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. ५१ नंबरच्या प्रस्तावात अनियमितता असल्याचा आरोप करीत भाजपने त्यावर बोलण्याची संधी स्थायी समिती अध्यक्षांकडे मागितीला. मात्र ही संधी नाकारण्यात आल्याने भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी पालिका मुख्यालयातील अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठाण मांडत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. 

त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे सदस्यही अध्यक्षांच्या दालनाबाहेर जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकीकडे भाजपकडून 'यशवंत जाधवांचा धिक्कार असो', अशी घोषणाबाजी तर शिवसेनेकडून शिवसेना जिंदाबाद, यशवंत जाधव जिंदाबाद, असे नारेबाजी सुरु करण्यात आली. दोन्ही पक्षाचे नगरसेवक आमने - सामने आल्याने तणाव वाढला. त्यामुळे पालिकेतील सुरक्षा रक्षकही सतर्क झाले. अखेर अध्यक्षांनी दालनाबाहेर येत भाजप सदस्यांना चहापाण्याला येण्याचे आमंत्रण दिले. मात्र भाजपने आपले धरणे आंदोलन कायम ठेवल्याने त्यांनी शिवसेना सदस्यांना आपल्याबरोबर कार्यालयात नेले. त्यामुळे पुढील वाढ टळला. 

या प्रस्तावांवर भाजपचा आक्षेप... 
रस्ता व पदपथ सुशोभिकरण, विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी, मास्क खरेदी, जंबो कोविड केंद्राचा खर्च, ऑक्सिजन प्लांट उभारणी, भंगारविक्री, आश्रय योजना, पेंग्विन देखभाल, नालेसफाई, वीर जिजामाता उद्यान विकास, बेस्ट डिजिटल तिकीट निविदा, मिठी- पोईसर नदी आदी विकास कामांच्या प्रस्तावावर बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असा भाजपचा आक्षेप आहे. 

अनेक प्रस्तावामध्ये अनियमितता असल्याने त्यावर आक्षेप घेतल्यास स्थायी समिती अध्यक्षांकडून मुस्कटदाबी केली जाते. अर्थपूर्ण प्रस्तावावर मात्र बोलू दिले जात नाही. यासाठी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. आमचा विकास कामांना विरोध नाही, तर त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आहे. अध्यक्षांकडून अनेक प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत. या मनमानी कारभाराविरोधात जनतेच्या न्यायालयात दाद मागणार. 
- प्रभाकर शिंदे (गटनेते, भाजपा)

स्थायी समितीच्या बैठकीत दरवेळी भाजपच्या सदस्यांना बोलायला दिले जाते. तरी ते जाणीवपूर्वक आरोप करतात, गोंधळ घालतात. भ्रष्टाचार बाहेर काढल्याच्या बाता करतात, तर कोविड काळात पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडामध्ये जो पैसे गेला, त्याचा हिशोब का दिला जात नाही, त्याबाबत भाजपवाले का काही बोलत नाही. 
- यशवंत जाधव (अध्यक्ष, स्थायी समिती)

खडाजंगीची दुसरी घटना.... 

वरळी येथील आगीच्या दुर्घटनेत जखमी रुग्णांवर नायर रुग्णालयात उपचार करण्यास दिरंगाई झाल्याच्या प्रकरणात शिवसेना - भाजप नगरसेवक ४ डिसेंबर २०२१ रोजी आपसात भिडले होते. राणी बागेत आयोजित महासभा आटोपल्यानंतर शिवसेना - भाजप नगरसेवक एकमेकांवर धावून गेले होते. हा वाद एवढ्यावरच न मिटता पोलिसांपर्यंत पोहोचला होता. 

Web Title: Shiv Sena BJP corporators clash again in Mumbai corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.