- मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील पावन धाम जैन मंदिरातील पावन धाम कोविड केअर सेंटर वरून आर/ मध्य आर/उत्तर वॉर्डच्या मासिक बैठकीत शिवसेना व भाजपा नगरसेवकांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शिवसेना व भाजपा नगरसेविकांनी जोरदार आरडा ओरडा केला.
कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना बेड, उपचार, ऑक्सिजन मिळण्यासाठी होणाऱ्या अडचणींवर मात करत उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि कांदिवली पश्चिम महावीर नगर मध्ये पावन धाम जैन मंदिरात 75 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारले. दि,1 मे रोजी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते कोविडच्या पहिल्या टप्यात सदर कोविड सेंटर सुरु झाले होते. कोविडची पहिली लाट ओसरल्यावर सप्टेंबरमध्ये सदर कोविड सेंटर बंद झाले होते आता परत आर मध्य वॉर्डने सदर कोविड सेंटर सुरू करण्यास पुम्हा परवानगी दिल्याने दि,24 एप्रिल रोजी पुन्हा सुरू झाले.आता पर्यंत येथे 1800 रुग्ण कोरोना मुक्त झाले.
आज आर/उत्तर आणि आर/मध्य प्रभाग समिती वरच्युल बैठकीत वॉर्ड क्रमांक १२ च्या शिवसेना नगरसेविका गीता सिंघण यांनी हरकतीचा मुद्दा उठवला. पावन धाम कोविड सेंटर हे पालिकेने ताब्यात घेऊन मोफत चालविले पाहिजे. या हरकतीच्या मुद्याला शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांनी पाठिंबा दिला.
नगरसेविका गीता सिंघण यांनी लोकमतला सांगितले की,सदर कोविड सेंटर हे विशिष्ट जाती धर्माच्या नागरिकांसाठी चालवले जात असून भाजपा आपले नाव पुढे करत राजकारण करत आहे. सर्वसामान्यांना नागरिकांना येथे मोफत प्रवेश मिळाला पाहिजे आणि वॉर रूम मधून येथे कोविड रुग्णांच्या अँडमिशन झाली पाहिजे.
आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर यांनी सांगितले की,मुंबई महानगर पालिका ही स्वायत्त संस्था असून गेली दीड वर्षे कोविड निर्मूलनासाठी अविरत कार्य करत आहे. येथे कोणीही राजकारण करू नये आणि नागरिकांना मोफत उपचार मिळाले पाहिजे. या वेळी भाजप वॉर्ड ८ चे नगरसेवक हरीश छेडा आणि वॉर्ड २ चे नगरसेवक जगदीश ओझा यांनी या हरकतीच्या मुद्याला जोरदार विरोध केला.
हरीश छेडा यांनी सांगितले की रुग्णांना येथे वेळेवर चांगले उपचार मिळत असून उत्तम डॉक्टर व सुसज्ज वैद्यकीय सुविधा मिळत असून नागरिक पैसे भरायला तयार आहेत. मात्र इथे द्वेष ईर्ष्या भावनेचे राजकारण करून हरकतीचा मुद्दा उठवणे चुकीचे आहे. आज परिस्थिती अशी आहे की, पैसे देऊन सुद्धा बेड व ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा पावनधाम खरोखरच कोविड रुग्णांना आधारवड ठरत आहे.
नगरसेवक हरीश छेडा यांनी सांगितले की, मनपा, तसेच फायर ब्रिगेडच्या सर्व परवानगी आल्या नंतरच खासदार गोपाळ शेट्टी यांनी दि,24 एप्रिल रोजी पावन धाम कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले होते. त्यामुळे आता वाद करणे अयोग्य आहे.
भाजप नगरसेवक जगदीश ओझा यांनी नगरसेविका गीता सिंघण यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला खासदार गोपाळ शेट्टी आणि सामाजिक संस्थानी महानगरपालिका समोर पावन धाम कोविड केअर सेंटर तुम्ही चालवा असा प्रस्ताव दिल्याची आठवण करून दिली. एका चांगल्या चालत असलेल्या आरोग्य उपक्रमा बद्दल दुर्दैवाने शिवसेना नगरसेविकांना पोटदुखी का होते असा सवाल त्यांनी केला.
पावन धाम कोविड सेंटर बंद करणार पावन धाम कोविड सेंटरचे विश्वस्त निरव दोशी म्हणाले की, आजच्या पालिकेतील राजकारणाला आम्ही आता कंटाळले असून पावन धाम कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी आणि आम्ही करोडो रुपये खर्च करून पावन धाम जैन मंदिराचे तीन मजले कोविड सेंटरला दिले. यामध्ये आम्ही कोणतेही जाती पातीचे राजकारण केले नाही आणि आम्ही सर्वांना अगदी नाममात्र दरात सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे.