मुंबई : कचरा डब्यांच्या वितरणावरून शिवसेना-भाजपाच्या नगरसेविकांमध्ये शनिवारी बाचाबाची झाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद पालिकेच्या महासभेत आज उमटले. ‘शिवसेना डब्बा चोर’ अशी घोषणाबाजी भाजपाने केली. तर शिवसेनेनेही त्यास प्रत्युत्तर देत सभागृह दणाणून सोडले. यामुळे उभय पक्षांच्या नगरसेविकांमध्ये चांगलीच जुंपली होती. अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अर्थसंकल्पाचा विषय पटलावर मांडून या वादावर पडदा टाकला.चारकोप येथील शिवसेनेच्या संध्या दोशी यांच्या कचरा डब्यांच्या वितरणावरून वाद सुरू आहे. त्यांनी सुमारे साडेपाच हजार कचºयाच्या डब्यांचे वितरण न करता गोदामात ठेवले असल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेविका अंजली खेडेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पालिकेच्या महासभेत केला. तसेच नगरसेविका दोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र दोशी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. नगरसेवक निधीतून मिळालेल्या पाचशे डब्यांपैकी ४५० डब्यांचे वितरण झाले आहे. ५० डब्यांचे वितरण शिल्लक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मात्र भाजपाच्या नगरसेविकांनी हे डबे २०१५ ते २०१६ या कालावधीतील असल्याचा आरोप केला. या आरोपांचे प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी खंडन करीत भाजपाच्या नगरसेवकांवरच निशाणासाधला. भाजपा नगरसेवक दमदाटी करतात, अधिका-यांना कोंडून ठेवले होते.शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची सुटका केली, ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. पारदर्शक सरकारची घोषणा करणाºयांचा हाच का पारदर्शक कारभार, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. सभागृह नेते यशवंत जाधव यांनीही भाजपावर टीका केली.एकमेकांविरोधात घोषणाबाजी...- भाजपाच्या पारदर्शक कारभारावरच शिवसेनेने संशय घेतल्याने भाजपा नगरसेवक खवळले. यामुळे शिवसेनेविरोधात नगरसेविकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. शिवसेना डब्बे चोर तसेच मोदी-मोदींचा जयघोष भाजपाने सुरू केला.शिवसेनेनेही चोर..चोर.. अशा घोषणा देऊन त्यास प्रत्युत्तर दिले. भाजपाच्या नगरसेविका अंजली खेडेकर, ज्योती अळवणी, राजश्री शिरवाडकर आणि शिवसेनेच्या राजुल पटेल, किशोरी पेडणेकर यांच्यात बाचाबाची झाली. अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मंजुरीकरिता पटलावर ठेवल्याने वातावरण निवळले.
कचरा डब्यांच्या वितरणावरून शिवसेना-भाजपा नगरसेवकांमध्ये जुंपली, एकमेकांविरोधात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:41 AM