कोस्टल रोड प्रकल्पावरून शिवसेना - भाजपात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:25 PM2021-12-08T20:25:25+5:302021-12-08T20:25:34+5:30
भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅगच्या अहवालाचा दाखला देत कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
मुंबई - कोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागार, ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने अधिक रक्कम दिल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. या प्रकल्पाच्या कामात ६५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. मात्र सर्व विरोध डावलून या प्रकल्पातील सल्लागाराला सात कोटी २९ लाख रुपये शुल्क वाढवून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेने बहुमताच्या जोरावर मंजूर केला. यामुळे संतप्त भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी पालिका मुख्यालयात बुधवारी तीव्र निदर्शने केली.
भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅगच्या अहवालाचा दाखला देत कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मात्र पालिका प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच परदेशात वापरल्या जाणाऱ्या एकल स्तंभ पायाचा वापर केला जाणार आहे. या कामासाठी सल्लागारांच्या शुल्कातही वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे सात कोटी २९ लाख रुपये शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणला होता.
मात्र सल्लागाराला २१५ कोटी रुपये तर ठेकेदाराला कोणतेही काम न करता १४२ कोटी रूपये बेकायदेशीरपणे दिले आहेत. ६५० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप कॅगने केला आहे. सल्लागार, ठेकेदार व भ्रष्ट अधिकारी मिळून पालिकेची लूट करीत आहेत, असे आरोप करीत भालचंद्र शिरसाट यांनी उपसुचनेद्वारे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. परंतु, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला.
८५० कोटींचे वाढीव दारांचे प्रस्ताव...
स्थायी समितीमध्ये बोलण्याची संधी न मिळाल्याने भाजप सदस्यांनी सभागृहाबाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अध्यक्ष यांच्या विरोधात घोषणा देत ८४० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. एकाच वेळी ८४० कोटींचे प्रस्ताव आले असताना त्यावर चर्चा करू न देणे हे लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी घातक असल्याची नाराजी भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि पक्षनेते विनोद मिश्रा यांनी व्यक्त केली.
नेमका भ्रष्टाचार कितीचा?
त्यांचे एक नेते कोस्टलमध्ये १६०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात, तर दुसऱ्यावेळी ७५० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होतो. आता ६५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नक्की भ्रष्टाचार किती कोटींचा झाला? हे त्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन एकदाचे ठरवावे. शिवसेना असल्या हवेतील आरोपांना घाबरत नाही. मुंबईच्या विकासात बाधा आणण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची इच्छा कधी पूर्ण होणार नाहीत, असा टोला जाधव यांनी लगावला.