मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने भाजपाशी हातमिळवणी केली. मुंबईतील काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा दिला. त्यात मागठणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचाही समावेश आहे. अलीकडेच एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रकाश सुर्वे चांगलेच अडचणीत आलेत. त्यात आता भाजपा कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीमुळे भाजपाही आक्रमक झाल्याचं दिसून आले.
मागठणे मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. याबाबत आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. प्रवेशाचा बॅनर मतदारसंघात लागला. त्यानंतर राजकीय सूडबुद्धीने १९ वार डोक्यावर करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तो कुठल्या पक्षाचा असले तरी अशा प्रवृत्ती ठेचून काढायला हवा. इतके वार दिसूनही पोलीस गुन्हा नोंदवत नव्हते. तेथील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी दरेकरांनी सभागृहात केली.
तसेच वार होऊनही शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. माणूस मरतानाही त्याला वाचवण्यात आले नाही. ५५ लोक संघटितपणे गुन्हेगारी करतात. सीसीटीव्ही फुटेज मला मिळाले पोलिसांना मिळत नाही? सत्यता पडताळून कारवाई करतो असं आश्वासन डीसीपी देतात. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करा. तिथल्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना तात्काळ निलंबित करा. शताब्दी रुग्णालयात उपचार न करणाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करा. मुंबईचा बिहार करणार आहात का? असा संतप्त सवाल प्रविण दरेकरांनी केला. दरम्यान, म्हातारी मेल्याचं दु:खं नाही काळ सोकावतो. त्याठिकाणी ५५ जणांना तात्काळ अटक झाली पाहिजे. या दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी केली.
काय आहे प्रकरण?शिवसेनेतून अलीकडेच भाजपात प्रवेश केलेले विभीषण वारे यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात विभीषण वारे गंभीर जखमी झाले. वारे यांच्यावर दहिसरमधील सुखसागर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय सूडाच्या भावनेतून आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप विभीषण वारे यांनी केला. विभीषण यांनी प्रकाश सुर्वेंसह राज सुर्वे यांचेही नाव घेत गंभीर आरोप केला. हा मुद्दा आज प्रविण दरेकर यांनी सभागृहात उचलून धरत अप्रत्यक्षपणे प्रकाश सुर्वे यांच्यावर आरोप केलेत.