मुंबईत शिवसेना-भाजपा आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांचा बॅनर फाडल्यानं तणाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 03:45 PM2022-09-04T15:45:16+5:302022-09-04T15:45:46+5:30
आम्ही बॅनर फाडायचे ठरवले तर मातोश्रीच्या बाहेरचेही बॅनर फाडू पण ही आमची संस्कृती नाही असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं.
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. वरळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर फाडल्याने तणाव वाढला आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे पोस्टर फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, बॅनर फाडणे ही फालतुगिरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची असू शकते. आम्ही बॅनर फाडायचे ठरवले तर मातोश्रीच्या बाहेरचेही बॅनर फाडू पण ही आमची संस्कृती नाही. त्या बॅनरवर गणपती बाप्पाचा फोटो आहे त्यामाध्यमातून गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले होते. हे बॅनर कुणी लावले त्यापेक्षा त्यामागची भावना काय हे समजून घ्यायला हवं होतं. यावर आदित्य ठाकरे जे उत्तर देतात ते बालिशपणाचं लक्षण आहे असा टोला त्यांनी लगावला.
तसेच ताकद, बॅनर फाडणे या गोष्टी आम्ही फार वर्षापूर्वी केल्यात. त्यामुळे या घटनेला फार महत्त्व देत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांकडे लक्ष द्यायला पाहिजे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने ५० चा आकडा गाठला तरी त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असेल. किशोरी पेडणेकरांच्या डोक्यातील महापौरपदाची हवा उतरली नाही. ती शांत होऊ द्या. हवेतून खाली यावं असा भाऊ म्हणून सल्ला देईन. उद्धव ठाकरेंचा एकमेव कार्यक्रम हम दो, हमारे दो, और मातोश्रीके बाहर मत आने दो असा चिमटाही आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना काढला आहे.
भास्कर जाधवांनी मानसिक उपचार करावेत
दरम्यान, भाजपाला दंगली घडवण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणारा भाजपा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सोबतीनं महाराष्ट्राचा विकास करतायेत. भास्कर जाधव यांचे डोके फिरलेलं आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. शिवसेनेत मंत्रिपद मिळालं नाही. एकनाथ शिंदेंनी घेतले नाही तर भाजपात येऊ शकले नाहीत त्यामुळे भास्कर जाधवांची चलबिचल झाली आहे. स्वत:चं अस्तित्व पक्षनेतृत्वासमोर दाखवून नेतेपद मिळवलं. भास्कर जाधवांनी मानसिक उपचार करून घ्यावेत मग विधान करावं असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.