Join us

शिवसेनेचा भाजपावर पलटवार !

By admin | Published: April 19, 2017 1:10 AM

पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी महापालिकेत नाकाबंदी केल्याने शिवसेनेनेही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई : पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी महापालिकेत नाकाबंदी केल्याने शिवसेनेनेही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार गेली अनेक वर्षे राज्य शासनाकडून येणे असलेली साडेतीन हजार कोटींची थकबाकी देण्याची मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपा सरकारकडे लावून धरली आहे. तर दुसरीकडे तीन हजार कोटींच्या तुटीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला खड्ड्यात घालणाऱ्या ‘किंग लॉन’ बसगाड्यांची खरेदीही भाजपा अध्यक्षांच्या कार्यकाळात झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने पारदर्शक कारभारावरच निशाणा साधला आहे.भाजपाने गेले काही दिवस आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी केली आहे. शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेत अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही आता पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे मनसुबे आखले आहेत. त्यानुसार गेली अनेक वर्षे राज्य सरकारकडून येणे असलेले तीन हजार ५२३ कोटी रुपये देण्याची मागणी महापौरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ही थकबाकी गेल्या अनेक वर्षांची असून, विशेषत: याआधीच्या सरकारच्या काळातील आहे. मात्र यासाठी भाजपावर निशाणा साधून त्यांना शह देण्याचा शिवसेनेचा इरादा आहे.तर दुसरीकडे तीन हजार कोटींचे कर्ज असलेल्या बेस्टला खड्ड्यात घालणारी किंग लॉन बसची खरेदी बेस्ट समितीवर भाजपाचे अध्यक्ष असताना झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला. २००९मध्ये चिनी बनावटीच्या किंग लॉन बस खरेदी करून हजारो कोटींचे नुकसान करण्यात आले. मात्र या वातानुकूलित बसच्या प्रस्तावास शिवसेनेचा सदस्य म्हणून आपला कायम विरोध होता, असे स्पष्ट करीत पोतनीस यांनी शिवसेनेला ‘सेफ’ केले आहे. (प्रतिनिधी)