सत्तेसाठी शिवसेना, भाजपाने घेतला नकली घटस्फोट

By admin | Published: February 20, 2017 04:14 AM2017-02-20T04:14:56+5:302017-02-20T04:14:56+5:30

मुंबई महापालिकेतील सत्ता राखण्यासाठीच शिवसेना आणि भाजपाने २५ वर्षांची युती तोडली आहे. या अभद्र युतीच्या भ्रष्ट कारभाराचा विसर पडावा

Shiv Sena, BJP took forged powers for fake divorce | सत्तेसाठी शिवसेना, भाजपाने घेतला नकली घटस्फोट

सत्तेसाठी शिवसेना, भाजपाने घेतला नकली घटस्फोट

Next

मुंबई : मुंबई महापालिकेतील सत्ता राखण्यासाठीच शिवसेना आणि भाजपाने २५ वर्षांची युती तोडली आहे. या अभद्र युतीच्या भ्रष्ट कारभाराचा विसर पडावा म्हणूनच या दोन्ही पक्षांनी नकली घटस्फोट घेतला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे मीडिया प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी रविवारी केला.
काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयातील पत्रकार परिषदेत सुरजेवाला म्हणाले की, आता एकमेकांशी भांडणाऱ्या या दोन्ही पक्षांनी सत्ता उपभोगण्यासाठी निवडणुकीनंतर एकत्र येणार नाही असे लेखी वचन मुंबईकरांना द्यावे. शिवसेना भाजपा हे एक मक्कार गठबंधन आहे तसेच ते मक्कारशादी डॉटकॉम आहे. यांचा भांडाफोड करण्याची आता वेळ आलेली आहे. मुंबईत भाजपाने ३५०० होर्डिंग्ज लावले आहेत, प्रत्येक होर्डिंगसाठी साडेचारलाख रुपये खर्च आहे. सुमारे ५०० कोटी जाहिरातबाजीवर खर्च केले गेले. भाजपाकडे इतका पैसा कसा आला याचे उत्तर मुंबईकरांना मिळायला हवे. हा सगळा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. भाजपा भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडालेला आहे. २० वर्षे मुंबईत शिवसेना व भाजपाची सत्ता होती. त्यांनी एकत्र मिळून मिसळूनच सर्व घोटाळे आणि भ्रष्टाचार केलेले आहेत.
भाजपा शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार चालवणार आहे. सध्या निवडणुकीपुरतेच हे दोघे एकमेकांवर आरोप करत असल्याचा खुलासा खुद्द अमित शहा यांनी केला आहे.
दोन्ही पक्षांनी मुंबईकरांची फसवणूक चालवली असून मुंबईकरांनी सावध होण्याची गरज आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधा, नागरी सेवांची वाताहत झाली आहे. त्यामुळे यावेळी मुंबईत बदल झाला पाहिजे, असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.
मुंबईचा अर्थसंकल्प ३७००० कोटींचा आहे. त्यामानाने मुंबईकरांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीत. मुबलक व स्वच्छ पाणी मिळत नाही. चांगले रस्ते मिळत नाहीत, सगळीकडे खड्डे रस्ते आहेत. शहरात रस्ते अपघात, रेल्वे अपघात वाढत चाललेले आहेत. चांगल्या व सुसज्ज अशा आरोग्य व्यवस्था नाहीत. रोगराई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. गुंडगिरी, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. महिला सुरक्षित नाहीत, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena, BJP took forged powers for fake divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.