Join us

शौचालयाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपत श्रेयवाद, दहिसरमध्ये कार्यकर्ते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 2:49 AM

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मागाठाणे विधानसभेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर मागाठाणे विधानसभेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. निमित्त होते ते दहिसर पूर्व येथील केतकीपाड्यात शौचालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. दहिसर येथील केतकीपाड्यात शौचालयाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपत श्रेयवाद रंगला होता.मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील दहिसर (पूर्व) प्रभाग ३ महाराष्ट्र खदान, धारखाडी येथील शौचालय मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता योजनेअंतर्गत शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या पाठपुराव्याने बांधण्यात आले. शनिवारी दुपारी ३ वाजता या शौचालयाचा लोकार्पण सोहळा होता. दुसरीकडे भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता या शौचालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. शुक्रवारी रात्री १० नंतर सदर कार्यक्रमाचे फलक या परिसरसत लागले होते. पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार ब्रीद यांनी सकाळी ९.३० वाजता केली. दरेकर यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शिवसैनिकांनी शनिवारी सकाळी ११ वाजता घटनास्थळी दाखल होत लोकार्पणास विरोध केला.दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. जोरदार घोषणाबाजी व बाचाबाची झाली. शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आपल्या पक्षांचे झेंडे भिरकावत होते. सुमारे दीड तास हा गोंधळ सुरू होता. पोलीस दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन मेगाफोनवरून करीत होते. पोलीस उप आयुक्त डॉ. एम.एस. स्वामी आणि दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. जमावर यांच्या मध्यस्थीने वातावरण अखेर शांत झाले.प्रकाश सुर्वे म्हणतात...नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी परवानग्या आणून त्यांच्या निधीतून शौचालय बांधले. तर प्रवीण दरेकर यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्यांचा डाव शिवसैनिकांनी उधळला.आमदार विलास पोतनीस म्हणतात...दरेकर यांची सदर कामाचे श्रेय लाटण्याचीभूमिका चुकीची होती.प्रवीण दरेकर म्हणतात...युतीच्या समन्वयातून हा कार्यक्रम झाला पाहिजे होता. येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण नारळ फोडून शौचालयाचे उद्घाटन केले. आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली. वाद अखेर मिटला.

टॅग्स :शिवसेनाभाजपा