मुंबई - मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील अंधेरी-गोरेगावदरम्यानच्या विस्तारित मार्गाच्या उदघाटनावर शिवसेनेने बहिष्कार घातला आहे. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वीपासूनच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच निघून गेले. शिवसेनेचे दिंडोशीचे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होती.
हार्बर रेल्वेच्या उदघाटन प्रसंगी सेना आणि भाजप कार्यकर्ते जोरदार शक्ति प्रदर्शन व घोषणाबाजी करतील अशी शक्यता लोकमतने बुधवारीच व्यक्त केली होती. दरम्यान, लोकमतचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. इतर सर्व आमदारांची नावे कार्यक्रम पत्रिकेत आहेत, मात्र माझेच नाव नाही.त्यामुळे मी स्वतः विधानसभेत हक्क भंग आणणार असल्याची माहिती यांनी लोकमतला फोन करून दिली. तर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत अखेर कार्यक्रमावर बहिष्कार घातला. दरम्यान, शिवसैनिक घोषणाबाजी करत निघून गेल्यानंतर आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. स्टेजवर उत्तर मुंबई भाजपा खासदार गोपाळ शेट्टी,महिला व बालकल्याण मंत्री विद्या ठाकूर,अमित साटम उपस्थित होते. याआधी जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या मधील उभारलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी तात्कातीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सेना व भाजपाने जोरदार घोषणाबाजी करून शक्ति प्रदर्शन केले होते, त्यामुळे घोषणाबाजीत हा उदघाटन सोहळा आटोपता घ्यावा लागला होता.