Join us

शिवसेना नावाने निवडणूक लढवता येणार पण; निलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 11:21 AM

धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल.

मुंबई - शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या  निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, आयोगाने शिवसेना हे नाव वापरण्यास परवानगी दिली असून केवळ शिवसेना या नावापुढे आणखी एखादं उपनाम देणं गरजेचं आहे. त्यामुळे, शिवसेनेला हा काहीसा दिलासाच म्हणावा लागेल. शिवसेना नेत्या आणि आमदार निलम गोऱ्हे यांनी ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली. 

धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल. शिवसेना नाव वापरतां येईल, परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल, अशी माहिती आमदार निलम गोऱ्हे यांनी दिली. शिवसेना त्याला simplicitor हा शब्द वापरला आहे. शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावे लागेल असे आयोगाने सुचविले आहे. तसेच, धनुष्यबाण गोठवण्याचा आयोगाचा निर्णय तात्पुरता आहे. चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू राहील हे आयोगानं म्हटलं आहे. अंतिम निवाडा कधी  ते पुढील काळात ठरेल, चुकीची माहिती पसरवू नये, असे निलम गोऱ्हे यांनी ट्विट करुन आवाहन केले आहे. त्यामुळे, शिवसेना नाव वापरुन अंधेरीतील पोटनिवडणूक शिवसेनेला लढवता येणार आहे. केवळ शिवसेना या नावासोबत आणखी एखादं नाव जोडावे लागणार आहे.  ठाकरे गटाचे वकील टी.व्ही. सिंग व सनी जैन यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याची पुष्टी करणाऱ्या ८०० कागदपत्रांची फाइल सादर केली होती. निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, १९६८ या कायद्यानुसार धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने केली होती. त्यावर ठाकरे गटाला शनिवारी उत्तर द्यावयाचे होते, तसे ते त्यांनी कागदपत्रांसह सादर केले होते. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठाकरे, शिंदे गटाने केली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते?

चिन्हाबाबत : धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल. त्यासाठी : शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटाने चिन्हांचेही तीन पर्याय पसंतीक्रमानुसार आयोगाला सोमवारी दुपारपर्यंत द्यायचे आहेत. त्याचा निर्णयही सोमवारी आयोग घेईल. 

नावाबाबत : शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही. त्यासाठी : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेमुंबईनीलम गो-हे